भाईंदर-ठाणे जलवाहतूक लवकरच? | Loksatta

भाईंदर-ठाणे जलवाहतूक लवकरच?

जलवाहतुकीच्या प्रकल्पासाठी मेरीटाइम बोर्डाकडून सक्षम अधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती करण्यात येईल

भाईंदर-ठाणे जलवाहतूक लवकरच?
संग्रहित छायाचित्र

वर्षभरात कामाला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मीरा-भाईंदर, वसई आणि ठाणे यांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या कामाला याचवर्षी सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जलवाहतुकीच्या प्रकल्पासाठी मेरीटाइम बोर्डाकडून सक्षम अधिकाऱ्याची लवकरच नियुक्ती करण्यात येईल तसेच याकामी उभारण्यात येणाऱ्या जेट्टीसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याने जेट्टीचा खर्च शासनाकडून करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. ठाणे जिल्ह्य़ाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, बससेवा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा जलवाहतुकीने जोडला जावा, अशी मागणी करण्यात येत होती. या वाहतुकीला याआधीच मान्यता देण्यात आली आहे. ही वाहतूक सुरू झाल्यास वसई, मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहेत. भाईंदर येथील नवघर खाडीकिनारी या जलवाहतुकीची जेट्टी बांधण्यासाठी मेरिटाइम बोर्डाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कळवले होते. त्यानुसार मेरिटाइम बोर्डाने जेट्टी बांधण्याचे १६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिकेला पाठवले आहे. १०० मीटर लांब आणि ५ मीटर रुंद, अशी पाईल जेट्टी या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने हा खर्च शासनाकडून करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे गोराई-बोरिवली, वसई आणि भाईंदर या मार्गावर रो रो वाहतूक प्रस्तावित असून त्याला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे. पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली की या कामालाही सुरुवात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या दोन्ही योजनांमुळे भाईंदर ते ठाणे या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलवाहतुकीचा किफायतशीर पर्याय उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-04-2017 at 03:20 IST
Next Story
पाच नगरसेवकांची बडतर्फी रखडली!