scorecardresearch

टंचाईग्रस्त शहापूरसाठी भावलीचे पाणी

गेली काही दशके तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ गावांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

९७ आदिवासी गावे आणि २५९ पाडय़ांसाठी २८१ कोटींची योजना

सागर नरेकर

बदलापूर : गेली काही दशके तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ गावांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. एकूण २८१ कोटींच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी घेतले जाणार आहे. येत्या तीन वर्षांत ही योजना मार्गी लागून शहापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटण्याची आशा आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा संपूर्ण आदिवासी तालुका आहे. या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती ही अति चढ-उत्तराची असून तालुक्यातील आदिवासी पाडे हे विखुरलेले आहेत. बेसॉल्ट खडकाने व्यापलेला हा तालुका असल्याने जमिनीची पाणी धारणक्षमता अत्यल्प आहे. त्यामुळे उन्हाळय़ापूर्वीच येथील बहुतांश भाग कोरडा पडलेला असतो. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच शहापूर तालुक्यातील गावपाडय़ांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला गावपाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.

शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा अशी महत्त्वाची धरणे आहेत. मात्र, तालुक्यातील टँकरग्रस्त गावपाडे हे उंचावर असल्यामुळे त्यांना तालुक्यातील धरणातून पाणीपुरवठा आर्थिकदृष्टय़ा शक्य होत नाही. त्यामुळे तालुक्यातील गावे आणि पाडय़ांना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून ग्रीड पद्धतीने गुरुत्वाकर्षणावर आधारित यंत्रनेणे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्याला दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेला नुकतीच  मंजुरी दिली आहे. एकूण २८१ कोटी ९८लाख २३ हजार ४८१ रुपयांची ही योजना असेल. योजनेतून प्रत्येक घरास नळ जोडणी दिली जाणार आहे. ग्रामपंचायतींनी  त्यासाठी  पाणीपट्टी आकारायची आहे. 

देखभालीचा खर्च कमी 

शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठय़ासाठी भावली धरणातून ०.४ टीएमसी पाणी २०१८ मध्ये आरक्षित करून ठेवण्यात आले आहे. गुरुत्व बलाने पाणी शहापूर तालुक्यात आणले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे येथील प्रादेशिक विभागाकडून केली जाणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून येणाऱ्या पाण्यावर ही योजना राबवली जाणार आहे. यात शहापूर नगरपंचायत नसेल. या कामाची निविदा लवकरच जाहीर होईल. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. 

– अरुण निरभवणे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water scarcity hit shahapur village ysh

ताज्या बातम्या