कडक उन्हाने भात करपले!

शेतकरी चिंतातूर; पीक वाचविण्यासाठी धडपड

भातपिकासाठी नाल्यातून पाणी नेताना.

शेतकरी चिंतातूर; पीक वाचविण्यासाठी धडपड

गेला महिनाभर पावसाने दढी मारल्याने भातपीक करपू लागली आहेत. दाणा भरायच्या काळातच पाणी नसल्याने भातपीक वाया जाते की काय? यामुळे भातउत्पादक चिंताग्रस्त आहेत.

वाडा तालुक्यात १८ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून या क्षेत्रात एकमेव भातपीक घेतले जाते. यापैकी ९९ टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे तर उर्वरित अवघे १ टक्का क्षेत्रावर सिंचनाची सुविधा आहे.

पालघर जिल्हय़ात भाताचे कोठार म्हणून हा परिसर ओळखला जातो. येथील बहुतांश कुटुंब फक्त भातशेतीवरच अवलंबून आहेत. विविध सेवा सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन येथील शेतकरी भातपीक घेत असतो. या वर्षी सुरुवातीपासून पाऊस चांगला होता. पेरणी व लागवडीची कामेही सुरळीत झाली होती. भातपिके बहरत असतानाच गेल्या महिनाभरापासून पावसाने दढी मारल्याने पीक कोमजू लागली. आता कडक उन्हामुळे करपू लागली आहेत.

भाताची रोपे पोटरीत (निसावाच्या स्थितीत) आली आहेत. बरेच दिवस पाऊस न पडल्याने शेतातील चिखल सुकून जमिनीला भेगा पडल्या आहेत. जवळपास असलेल्या नदी-नाल्यातून पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु, तेही शक्य नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. महागडी भातबियाणे, मोठय़ा प्रमाणात येणारा मजुरी खर्च यामुळे आधीच भातशेती आतबट्टय़ाचा व्यवसाय बनलेला असतानाच आता निसर्गानेही पाठ फिरविल्याने मोठी चिंता आहे.

येत्या आठ ते दहा दिवस पाऊस अजिबातच पडला नाहीतर येथील शेतकऱ्यांना मोठय़ा दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. जेथे-जेथे नदी, नाल्यांमधून भातपिकाला पाणी देणे शक्य आहे तेथे शासनाने तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे.   – अनिल पाटील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water scarcity in palghar

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या