एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून टंचाईला तोंड देत असलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा आणि वागळे इस्टेटमधील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. वारंवार पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या या भागांतील पाणी नियोजनासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. यापुढे एमआयडीसीकडून या परिसरात जास्त काळ पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यास या भागाला स्टेम प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालिकेच्या अभियंता विभागाला करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ठाणे महापालिकेला दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी बहुतांश पाण्याचे वितरण कळवा, मुंब्रा, दिवा आणि वागळे इस्टेटमधील काही भागांत करण्यात येते. गेल्या गुरुवारी सकाळपासून एमआयडीसीने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी या भागांचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्या वेळी ही टंचाई २४ तास असेल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पाणीपुरवठा ४० तासांनंतर म्हणजे शनिवारी दुपारनंतर सुरू झाला. त्यातच शनिवारी सायंकाळी पाण्याचा दाब वाढल्यामुळे खिडकाळी भागातील एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला. दुरुस्तीचे काम रविवारी दुपारी करण्यात आल्यानंतरही पाणीपुरवठा कमी दाबानेच होत होता. त्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील नागरिकांना चार दिवस पाण्यावाचून काढावे लागले. सोमवारीही अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. याचे तीव्र पडसाद उमटले.

राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांच्यासह नागरिकांनी सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करून अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या भागांमध्ये एमआयडीसीचा पाणीपुरवठा जास्त काळ खंडित झाल्यास त्यांना स्टेम प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करण्याविषयी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठीचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.

एमआयडीसीकडून कमीत कमी बंद घेण्यात यावा. तसेच बंदचा कालावधी कमी असावा. या बंदबाबत पुरेशा वेळेआधी महापालिकेला आणि नागरिकांना कळविण्यात यावे, असे महापालिका एमआयडीसीला कळविणार आहे. बंदच्या कालावधीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे किमान पाणीपुरवठा महापालिका आणि खासगी टँकरमार्फत करण्यात येईल. मुंब्रा प्रभाग समितीत पाणीपुरवठा विभागासाठी पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता तीन दिवसांत देण्यात येईल, असा निर्णय महापालिकेने घेतला असून त्याची अंमलबजावणी तीन दिवसांत केली जाणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा खंडित होताच कळवा, मुंब्रा आणि आसपासच्या परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच पाण्याचा दाब पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत स्टेमचे पाणी या भागासाठी वळविण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.     – डॉ. विपिन शर्मा, ठाणे महापालिका आयुक्त