ठाणे : सातत्याने पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलांचा पाणीपुरवठा गेल्या आठवडय़ापासून सुरळीत झाला असला तरी, वाघबीळ भागातील काही गृहसंकुलांची पाणी समस्या अधिक बिकट बनली आहे. पालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील विजय गॅलॅक्सी आणि आसपासच्या गृहसंकुलांना दररोज तीन ते चार टँकर मागवून गरज भागवावी लागत आहे. त्यावर होणारा रोजचा १२-१३ हजार रुपयांचा खर्च आता रहिवाशांना सोसवेनासा झाला आहे.

घोडबंदर भागाला महापालिकेकडून दररोज ९० दशलक्ष लिटरइतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या योजनेतून ७५ दशलक्ष लिटर तर स्टेम प्राधिकरणाकडून १५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या काही वर्षांत या भागात उभ्या राहिलेल्या मोठमोठय़ा गृहसंकुलांमुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्या तुलनेने ९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा अपुरा पडतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यासाठी नवीन पंप बसविण्याचे तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जलमापक बसविण्याचे काम गेल्या आठवडय़ात हाती घेतले होते. त्यासाठी शहराला होणारा पाणीपुरवठा २४ तास बंदही ठेवण्यात आला. मात्र या कामाला विलंब झाला. तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे गेल्या आठवडय़ात दोन-तीन दिवस घोडबंदरमधील अनेक गृहसंकुलांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र अजूनही वाघबीळ भागातील पाणीसमस्या सुटलेली नाही.

या भागातील विजय गॅलॅक्सी, विजय एन्क्लेव्ह, ग्रीन एकर फेज-१, पुजा कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या गृहसंकुलांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी टंचाईची समस्या कायम आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. या संकुलांमध्ये जवळपास एक हजार कुटुंबांचे वास्तव्य असून गेल्या वर्षीपासून त्यांना सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी पालिकेने दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्या वेळी केवळ तीनदाच संकुलातील रहिवाशांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागले होते. यंदाच्या वर्षी मात्र दररोज तीन ते चार टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाशी रंजन करोडे यांनी दिली. वाढीव नळजोडणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्यामुळे वाढीव नळजोडणी मिळण्यास विलंब होत आहे, अशी माहिती विजय गॅलॅक्सी संकुल समितीच्या सदस्या विद्या शेट्टी यांनी दिली.

वाढीव पाणी देण्याची प्रक्रिया

विजय गॅलॅक्सी, विजय एन्क्लेव्ह, पुजा कॉम्प्लेक्स या संकुलांमध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पाहाणी करून ही समस्या सोडविली आहे. संकुलांना आता पुरेसे पाणी मिळत आहे, तर विजय गॅलॅक्सीला वाढीव नळजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.