चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी समाधानकारक; १५ दिवसांतून एकदा पाणीकपात

ठाणे जिल्हय़ातील नागरी वस्ती आणि औद्योगिक विभागाला दररोज सुमारे ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. चालू वर्षी चांगला पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी योग्य आहे. सध्या १५ दिवसातून एकदा पाणीकपातीचे धोरण सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंत मुबलक आहे, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पाण्याचा दैनंदिन वापर आणि जून, जुलैमधील पावसाच्या आगमनाचा अंदाज काढून पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यात येत आहे. लघू पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाणीसाठय़ासंदर्भात निर्णय घेतले जातात. त्या विभागाच्या आदेशाप्रमाणे पाणीकपातीचे धोरण अनुसरले जाते, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बारवी धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाणीसाठा वाढल्यानंतर धरणाच्या पाठीमागील (बॅक वॉटर) परीघ क्षेत्रातील पाण्याच्या विस्तारात वाढ होणार आहे.

या विस्तार वाढीचा मुरबाड तालुक्यातील तोंडली, मोहघर, काचकोळी, सुकाळवाडी, कोळेवडखळ, मानिवली व इतर पाच पाडय़ांना फटका बसणार आहे. त्यामुळे या गावांचे अन्य भागांत स्थलांतर करण्याचे प्रयत्न मागील सात ते आठ वर्षांपासून औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू होते. योग्य मोबदला मिळत नसल्याने ग्रामस्थांनी अन्यत्र स्थलांतरास विरोध केला होता. आता योग्य तो मोबदला देण्याची तयारी शासनाने केल्याने या सहा गावे व पाडय़ांमधील ७७६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. धरणाची उंची वाढविल्यानंतर धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होणार आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करण्यासाठी पाच मेगाव्ॉट क्षमतेचा जल विद्युत प्रकल्प उभारणीसाठी महामंडळाला परवानगी मिळाली आहे. या वीजनिर्मितीचा वापर महामंडळाच्या कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे, असे एमआयडीसी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. बारवी धरणाच्या मध्यभागी ८०० मीटर लांबीची दगडी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीच्या वरील भागात ११ वक्र दरवाजे बसविण्यात आले आहेत. पाण्याच्या गतिमान प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे दरवाजे करणार आहेत. गावांच्या पुनर्वसनामुळे धरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सांडव्यापर्यंत येऊन थांबले आहे. ६८.६० मीटरवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. जल प्रवाह प्रतिबंधित भिंतीची उंची वाढविण्याचे काम ६५ मीटपर्यंत पूर्ण झाले आहे.