धरणातील पाणीसाठय़ावर नवी मुंबईचीच मालकी; जलसंपदा विभागाच्या आदेशाला केराची टोपली

नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर, या शहराला बारवी धरणातून दररोज मिळणारे १४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण-डोंबिवली पालिकेकडे वर्ग करण्यात यावे, असे आदेश सात वर्षांपूर्वी राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. मात्र राज्यात आघाडीची सत्ता आणि गणेश नाईक ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री असल्याने, हे पाणी वळविण्यात शासनस्तरावर अडथळे आणले जात होते. पण, आता राज्यात सत्ता बदल होऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तरीही, युतीचे सरकार बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाटय़ाचे शासन निर्णयानुसार देण्यात येणारे १४० दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली पालिकेला देण्यात टाळाटाळ करीत असल्याने अद्याप सरकारमध्ये गणेश नाईक यांचेच वर्चस्व आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात शिवसेना, भाजप युतीचे एकूण चार आमदार आहेत. हे आमदार बारवी धरणातून नवी मुंबईला सोडण्यात येणारे १४० दशलक्ष लीटर पाणी कल्याण डोंबिवलीला वळते करण्यात यावे, या विषयावर आक्रमक होत नसल्याने, या आमदारांचे नवी मुंबई आणि नाईक यांच्याशी काही राजकीय गणित आहे की काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कल्याण डोंबिवली शहरात पाणी कपातीमुळे तीव्र पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. त्यात २७ गावांचा बोजा पालिकेवर टाकण्यात आला आहे. पालिका हद्दीतील १५ लाख लोकसंख्येसाठी ३०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत असला तरी, यामधील २१ टक्के पाण्याची गळती आणि ४० ते ५० दशलक्ष लीटर पाणी दररोज बेकायदा बांधकामे, इमारतींना चोरून वापरण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून समजते.

शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हे माहिती असूनही कल्याण डोंबिवलीतील शिवसेना, भाजपचे आमदार गुपचिळी धरून का बसले आहेत, असे प्रश्न सामान्यांकडून केले जात आहेत. महिला वर्ग पाणी टंचाई आणि आमदारांच्या गुपचिळीमुळे संतप्त झाला आहे. शहरातील युतीच्या चारही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बारवी धरणातील नवी मुंबईचे पाणी कल्याण डोंबिवली शहरांना मिळण्यासाठी आग्रही असणे आवश्यक होते, असे मत रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

निवडणुकीतील घोषणा कुठे विरल्या?

काँग्रेसचे कल्याणमधील आमदार संजय दत्त प्रत्येक अधिवेशनात बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाटय़ाचे पाणी कल्याण डोंबिवली पालिकेला द्या म्हणून प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यांच्याही पाठपुराव्याची दखल शासनाकडून घेतली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांना भरभरून मते दिली. शिवसेना नेत्यांनीही शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन पालिका निवडणुकीत दिले आहे. राज्यात युतीचे सरकार आणि पालिकेत युतीची सत्ता आहे. मग, पालिका निवडणुकीत मुबलक पाणी देण्याच्या केलेल्या घोषणा विरल्या कोठे, युतीच्या आमदारांना लगेच पाण्याचा विसर पडला कसा, असे प्रश्न रहिवाशांकडून केले जात आहेत.

मीरा भाईंदरचे लाड!

आघाडी सरकारमध्ये गणेश नाईक हे मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे बारवी धरणातील नवी मुंबईच्या वाटय़ाचे १४० दशलक्ष लीटर पाणी कडोंमपाला देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याची राजकीय वर्तुळात त्यावेळी चर्चा होती. नवी मुंबईत पाणी टंचाई नकोच, त्याच बरोबर आपल्या लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदपर्यंतच्या रहिवाशांची पाण्याची तहान या वाढीव पाण्यातून भागविण्याच्या हालचाली त्यावेळी सुरू होत्या. पण ओरड झाल्याने हा स्थगित झाला होता.