ठाणे : उथळसर भागातील जलकुंभावरून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची पाणीगळती थांबविण्याकरिता ठाणे महापालिकेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उथळसर, राबोडी, ठाणे मध्यवर्ती कारागृह, खारकर  आळी आणि पोलीस वसाहत भागात शनिवारी  सकाळी ९ वाजेपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या जलकुंभावरून राबोडी क्रमांक १ आणि २, के-व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, मध्यवर्ती कारागृह, पोलीस वसाहत परिसर, एन.के.टी महाविद्यालय परिसर, खारकर आळी आणि पोलीस शाळा भागात पाणीपुरवठा केला जातो. या भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर के-व्हिला येथील पाणीगळती थांबविण्याकरिता दुरुस्तीचे काम महापालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या भागात शनिवारी  सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.