खंडित पाणीपुरठ्यावर मात्रा; जलवाहिन्या एकमेकांना जोडण्याचा निर्णय

वसई : शहरात वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा सुरू रहावा यासाठी पालिकेने शहरातील सर्व जलवाहिन्या एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडू लागले आहे. वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर आणि उसगावमधून २० आणि पेल्हारमधून १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण २१ टक्क्यांहून अधिक असल्याने मिळत असलेल्या पाण्यातूनही ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. या समस्यांमध्ये नव्याने भर पडली आहे, ती वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याची.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील जलवाहिन्या विविध कारणांमुळे फुटू लागल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागत असतो. या काळात संबंधित भागाचा पाणीपुरवठा खंडित होतो आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत असते. धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या जुन्या झाल्यामुळे वारंवार गळती होत असते. त्यामुळे देखील पाणीपुरवठा खंडित होत असतो.

या समस्यांवर उपाय म्हणून पालिकेने शहरातील जलवाहिन्या एकमेकांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एखाद्या भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या जलवाहिन्यांमधून त्या भागाला पाणी पुरवणे शक्य होणार आहे. याबाबत माहिती देताना पालिकेचे उपायुक्त (पाणीपुरवठा) शंकर खंदारे यांनी सांगितले की, धरणातून येणाऱ्या जलवाहिन्या प्रत्येक भागात वितरित करण्यात आल्या आहेत. त्यातील एखादी जलवाहिनी फुटली तरी संबंधित भागाचा पाणीपुरवठा खंडित होतो. या जलवाहिन्या एकमेकांना जोडल्या तर सलग पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. या जलवाहिन्या एकमेकांना कशाप्रकारे जोडता येतील, याबाबत तांत्रिक बाजू तपासण्याच्या सूचना पालिकेच्या अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे करणे शक्य झाल्यानंतर रीतसर प्रक्रिया पुर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही खंदारे यांनी सांगितले.

जलवाहिन्या बदलणार; २७ कोटींचा खर्च

ल्ल पालिकेच्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून आजवर त्या बदलण्यात आलेल्या नव्हत्या. त्या खराब झाल्याने सातत्याने फुटत असतात. याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) ची नेमणूक केली होती. त्यांनी या जलावाहिन्यांचे संरचनात्मक (स्ट्रक्चरल) तसेच हायड्रोलिक्स सर्वेक्षण केले.

त्या अहवालात जलवाहिन्या तात्काळ बदलण्याची शिफारस पालिकेला करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेने त्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात उसगाव धरणाच्या जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. उसगाव धरण १९९४ साली बांधण्यात आले होते. तेव्हापासून त्या जलवाहिन्या बदलल्या नव्हत्या.

उसगाव धरणातून दररोज २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिन्या बदलण्याचा खर्च २७ कोटी रुपये एवढा आहे.

या जलवाहिन्या अधिका काळ टिकाव्यात यासाठी सिमेंट कॉंक्रीटऐवजी मृदू पोलादी (एमएस) च्या जलवाहिन्या अंथरण्यात येणार आहे.

शहरातील जलवाहिन्या एकमेकांना जोडण्याचा तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू आहे. या जलवाहिन्या एकमेकांना जोडल्या तर पाणीपुरवठा जरी खंडित झाला तरी इतर पर्यायी जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल – शंकर खंदारे, उपायुक्त (पाणीपुरवठा) वसई-विरार महापालिका