अंबरनाथः गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथच्या आनंदनगर भागात सुरू असलेल्या महापारेषणच्या रोहित्र क्षमतावाढीच्या कामासाठी दररोज काही तासांसाठी वीज पुरवठा खंडीत केला जातो आहे. बुधवारी इयत्ता बारावीच्या परिक्षांना त्याचा फटका बसला. आता शहरातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे उत्सवाच्या दिवशीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे. तसेच पुढच्या काही दिवसात अनियमीत आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहितीही प्राधिकरणाने दिली आहे.

अंबरनाथच्या आनंदनगर येथे १२ मार्च ते २० मार्च दरम्यान ५० मेगाव्हॅट ऍम्पियरचे रोहित्र बदलून त्याठिकाणी १०० मेगाव्हॅट ऍम्पियर क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येते आहे. त्यामुळे आनंद नगर येथील भार कमी करण्यासाठी खरवई इन्कमर आणि पोद्दार इन्कमर या वाहिन्यांचा भार ११ मार्चपासून मोरिवली उपकेंद्रावर स्थलांतरित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणाच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. या वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी अनेकदा वीज पुरवठा खंडीत केला जातो आहे. सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बदलापूर शहरातील बॅरेज बंधारा आणि अंबरनाथ तसेच बदलापूर शहरातील पाणी उचल यंत्रणेवर परिणाम होतो आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहराला होणारा पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात अशाच पद्धतीने पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होईल असेही प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे तसेच प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ऐन परिक्षा काळात सुरू असलेल्या महावितरणाच्या कामामुळे वीज पुरवठा खंडीत होत असून त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसतो आहे. बुधवारी माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेत अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंबरनाथच्या किंग्स लॉर्ड शाळेतील १० विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनाने संताप व्यक्त केला आहे. शाळांना याचा फटका बसता असतानाच आता शहराच्या पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम होतो आहे. ऐन उत्सवाच्या निमित्ताने होत असलेल्या या पाणी समस्येमुळे नागरिकांतही संताप व्यक्त होतो आहे.