Premium

ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये उद्या पाणी नाही; एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

water supply MIDC stopped tomorrow cities thane district
ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये उद्या पाणी नाही; एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्या, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करण्यात येतो. याशिवाय, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे टिसीसी अशा औद्योगिक वसाहतींनाही पाणी पुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीमार्फत हा पाणी पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील पाण्याचा हा महत्वाचा स्त्रोत मानला जातो. धरणातील पाणी साठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी एमआयडीसीकडून नियोजन करण्यात येते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू करण्यात येते.

हेही वाचा… ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन; यंदा ४४६ मेट्रिक टॅन भाजीपाल्याची निर्यात

यंदा मात्र धरण क्षेत्रात पुरेसा साठा असल्यामुळे पाणी कपात लागू करण्यात आली नव्हती. परंतु यंदा मोसमी पावसाला होणारा उशीर लक्षात घेऊन नगरविकास विभागाने महापालिकांना पाणी व्यवस्थापनाचे आदेश दिले आहेत. पालिकांबरोबरच एमआयडीसीनेही धरण क्षेत्रातील पाणी साठ्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार १५ ऑगस्टपर्यंत पाणी साठा पुरविण्यासाठी जून महिन्यापासून दर शुक्रवारी शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसीकडून दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार, २ जून पासून केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २ जून रोजी दुपारी १२ ते शनिवार, ३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे शहरातील काही भागात पाणी नाही

एमआयडीसीकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. यामुळे कळवा, वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर, घोडबंदरमधील कोलशेत खालचा गाव आणि दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) भागातील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 19:52 IST
Next Story
ठाणे जिल्ह्यात भाजीपाल्याचे मुबलक उत्पादन; यंदा ४४६ मेट्रिक टॅन भाजीपाल्याची निर्यात