एका धरणाचा मृत्यू!

वसई-विरार शहरातील सर्वात जुने धरण म्हणून विरारचे पापडखिंड धरण प्रसिद्ध होते.

वर्षांपासून विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण आता इतिहासजमा होणार आहे.

पाणी प्रदूषित झाल्याने पापडखिंड धरण कायमस्वरूपी बंद; वॉटर पार्क विकसित करण्याचा निर्णय

वर्षांपासून विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण आता इतिहासजमा होणार आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे धरणातील पाणी प्रदूषित झाले असून या धरणातील पाण्याचा वापर थांबवण्यात आला आहे. हे धरण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला असून या ठिकाणी वॉटर पार्क तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वसई-विरार शहरातील सर्वात जुने धरण म्हणून विरारचे पापडखिंड धरण प्रसिद्ध होते. विरार पूर्वेला जीवदानी डोंगराच्या पायथ्याला फुलपाडा येथे असलेल्या या धरणातून विरारकरांना दररोज १ दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरणात छटपूजा केली जात होती आणि धरणाच्या पाण्यात तेल सोडण्यात येते होते. त्यामुळे पाणी दूषित झाले होते. पर्यटकांकडून धरणात कचरा टाकला जात होता, तसेच या धरणाता आत्महत्या केलेल्या लोकांचे कुजलेले मृतदेहही सापडले होते. या धरणाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे हे पाणी दूषित झाल्याने त्यातील पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या भागातील नागरिकांना या पाण्याच्या मोबदल्यात सूर्या प्रकल्पातील १ दशलक्ष लिटर्स पाणी वळवण्यात आले आहे.

महापालिकेने वारंवार प्रयत्न करूनही पापडखिंड धरणातील प्रदूषण रोखण्यात अपयश आले आहे. धरणाची शुद्धीकरण यंत्रणा जुनाट झाली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आता या धरणातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे. भविष्याचही या धरणाचे पाणी शुद्ध ठेवता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर महापालिकेने हे धरण कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदूषण कसे?

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे धरण प्रदूषित होऊ  लागले आहे. दरवर्षी बंदी डावलून हजारो नागरिक छटपूजेसाठी या पाण्यात उतरतात. धरणाच्या पाण्यात अंघोळ आणि हजारो तेलाचे दिवे सोडले जात होते. याशिवाय निर्माल्य सोडले जात होते. धरणासाठीचा बंदोबस्त अपुरा असल्याने नागरिक धरणाच्या पाण्यात अंघोळ करत होते आणि कचरा टाकत होते. याशिवाय या धरणात मृतदेहही आढळले होते.

धरणाचा इतिहास

विरार शहराची लोकसंख्या १९७२ मध्ये १५ हजार होती. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर राज्य शासनातील तत्कालीन मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी पापडखिंड धरण मंजूर करवून घेतले होते. १९८० नंतर लोकसंख्या वाढू लागली. त्यानंतर १९८४ साली नाालसोपारा पूर्वेला पेल्हार धरण बांधण्यात आले. या धरणातून ६ दशलक्ष लिटर आणि उसगावमधून १ दशलक्ष लिटर असे पाणी विरारकरांना मिळत होते. १९९१ साली दांडेकर समितीच्या अहवालानंतर उसगाव धरणांचे काम हाती घेण्यात आले. या उसगाव धरणातून विरारला पाणी मिळू लागले. २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सूर्या प्रकल्प मंजूर करवून घेतला आणि शहरात सूर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी आले.

आम्ही या धरणाचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून थांबवला आहे. या धरणाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून तेथे पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉटर पार्क बनवण्यात येईल.

– सतीश लोखंडे, आयुक्त महापालिका

हे धरण बंद करण्यात आले आहे. सूर्याचे अतिरिक्त १ दशलक्ष लिटर पाणी वळवण्यात आले आहे. सूर्याचे अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर्स पाणी शहरात येऊ  लागले असल्याने पाणीटंचाई राहणार नाही.

– प्रफुल्ल साने, माजी पाणीपुरवठा सभापती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply from papad khind dam stopped due to pollution

ताज्या बातम्या