कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या मोहने उदंचन केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी महावितरणकडून करण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंगळवारी बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.

मोहने उदंचन केंद्रा जवळ उल्हास नदीतून कच्चे पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केले जाते. हे पाणी मोहने येथून बारावे येथील जलशुध्दिकरण केंद्रात पाठविले जाते. तेथून हे पाणी कल्याण पूर्व, पश्चिम भागात वितरीत केले जाते.

मोहने उदंचन केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या सयंत्रामध्ये देखभाल दुरुस्तीचे काम महावितरण कंपनीकडून मंगळवारी सकाळी हाती घेतले जाणार आहे. हे काम रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत पाणी उचल, शुद्धिकरण प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी सोमवारी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता मोरे यांनी केले आहे.

मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने बुधवारी काही भागात कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असते, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.