कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या कल्याण जवळील मोहिली जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्राचा महावितरणच्या कांबा (म्हारळ) उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून बंद झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण डोंबिवली पालिकेची मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण आणि १५० दशलक्ष लीटरची उदंचन केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे कल्याणमधील काही भागात आणि डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा वीज पुरवठा सोमवारी रात्रीपासून बंद झाला आहे. महावितरणच्या कांबा उपकेंद्रातून हा वीज पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केंद्रांचा वीज पुरवठा खंडित झाला तर त्याची देखभाल, दुरुस्तीचे कंत्राट महावितरणच्या ठेकेदाराकडे आहे. पालिकेला या कामात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. १६ तास झाले तरी महावितरणकडून पाणी पुरवठा केंद्राच्या वीज वाहिनीचा बिघाड दुरुस्त करता न आल्याने पालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे. हे ही वाचा. डोंबिवलीत मोठागाव खाडीत वाळू माफियांच्या बोटी महसूल अधिकाऱ्यांकडून नष्ट मंगळवारी सकाळी डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पूर्व, पश्चिमेतील भोईरवाडी, चिकणघर, रामबाग, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रस्ता, असोकनगर, वालधुनी, शिवाजीनगर, जोशीबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, खडकपाडा रस्ता भागात पालिकेकडून पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी सकाळी नोकरदारांची कामावर जाण्याची, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गडबड, त्यात सकाळी नियमित सात वाजता पालिकेकडून नळाव्दारे येणारे पाणी न आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. पालिका कार्यालयातील, अभियंत्यांचे फोन नागरिकांकडून खणखणू लागले. यावेळी नागरिकांना मोहिली केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याचे समजले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि उदंचन केंद्राला महावितरणकडून कांबा येथील उपकेंद्रातून स्वतंत्र वीज वाहिकेतून वीज पुरवठा केला जातो. मागील दोन महिन्याच्या काळात दोन वेळा कांबा येथील उपकेंद्रात देखभाल, दुरुस्तीचे काम घेण्यात आले होते. त्यावेळी पूर्वनियोजित या दोन्ही केंद्रांचा पाणी बंद ठेवण्यात आला होता. हे ही वाचा. ठाण्यातील वाहतुकीला कोंडीचे ग्रहण वीज पुरवठा बंद झाल्याने पालिकेला उल्हास नदीतून पाणी उचलता आले नाही. तर काही जलशुध्दीकरण केंद्रात वीज पुरवठा असुनही तेथील तळटाकीत पाणी नसल्याने पालिकेला शहराला पाणी पुरवठा करता आले नाही. १६ झाले तरी वीज बिघाड ठेकेदाराला दुरुस्त करता का आला नाही याची चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण भरले आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही शहरांमध्ये काही दिवसांपासून काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, गांधारे रोड, वसंत व्हॅली, गोल्डन वोक हाॅटेलसमोरील परिसरात पाणी टंचाईची परिस्थिती आहे.