गेल्या १० वर्षापासून डोंबिवली जवळील २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा करा म्हणून ग्रामस्थ शासन पातळीवर संघर्ष करत आहेत. या मागणीची दखल घेण्यात येत नसल्याने २७ गाव परिसरात ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शासनाने २७ गाव हद्दीतील खोणी येथील म्हाडा वसाहतीला गुरुवारी मुबलक पाण्याची सुविधा देण्याचा २७ गाव ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोणीतील म्हाडा वसाहतीचे काम आठ वर्षापूर्वी सुरू झाले. या वसाहतींमध्ये चार हजार ५०० सदनिका उपलब्ध आहेत. एक नवीन गाव या वसाहतीच्या निमित्ताने २७ गावात वसले आहे. मागून उभ्या राहिलेल्या वसाहतीला शासनाने तत्परतेने एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवठा उपलब्ध करुन दिला. १० वर्षापासून २७ गावातील ग्रामस्थ गावांना त्यांच्या वाटणीचा १०५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्या म्हणून मागणी करणाऱ्या ग्रामस्थांची शासन दखल का घेत नाही, असा प्रश्न शिवसेना कल्याण तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

म्हाडा वसाहतीच्या पाणी जोडणीला आमचा विरोध नाही. त्या बरोबर २७ गावांचा पाणी पुरवठा आता सुरळीत केला नाही तर २७ गावांमधील ग्रामस्थ पाण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा म्हात्रे यांनी दिला.

२७ गावांमध्ये नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. शासन तत्परतेने त्यांना पाणी पुरवठा करते २७ गावांवर अन्याय का, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला. सागाव, सोनारपाडा, गोळवली, आजदे, सागर्ली, घारिवली, संदप येथील शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन एमआयडीसीला दिली. शिळफाटा रस्त्यासाठी जमिनी दिल्या. ग्रोथ सेंटर गावच्या जमिनीवर उभे राहणार आहे. गावच्या जमिनी विकासासाठी घेऊन शासन, आमदार, खासदार ग्रामस्थांना गाजरे दाखवत आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला.

२७ गावांना खमक्या लोकप्रतिनिधी नसल्याने गावे नेहमी उपेक्षित राहत आहेत. एमआयडीसीसाठी जमिनी घेताना बाधित गावांना पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही, अशी टीका म्हात्रे यांनी केली.बारवी धरणातून दररोज ९०० दशलक्ष लिटर पाणी ठाणे जिल्ह्यातील निवासी, औद्योगिक वसाहतींना केला जातो. या पुरवठ्यातील १०५ दशलक्ष लिटर पाण्याचा वाटा २७ गावचा आहे. गावांना ६० दशलक्ष पाणी पुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. उर्वरित ४५ दशलिटर पाणी पुरवठा गावांना दिले तर गावांमधील पाणी प्रश्न सुटणार आहे. हे पाणी एमआयडीसीकडून परिसरातील नवीन गृहसंकुलांना देत असल्याची टीका प्रकाश म्हात्रे यांनी केली. दिवा शहराला वाढीव १० एमएलडी पाणी देण्यात आले. २७ गावांवर अन्याय का, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला.

‘एमजीपी’ची मंजुरी

खोणी येथील म्हाडा वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या मंजुरी नुसार १७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा म्हाडा वसाहतीला केला जाणार आहे, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी प्रकाश म्हात्रे यांना दिली.

दिवा, खोणी म्हाडा वसाहतीला देण्यास एमआयडीसीकडे पाणी आहे. अनेक वर्ष पाण्याची मागणी करणाऱ्या २७ गावांना पाण्या वाचून वंचित का ठेवले जाते. लवकरच याविषयी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल. – प्रकाश म्हात्रे , शिवसेना तालुकाप्रमुख ,कल्याण ग्रामीण

गावांच्या वाटणीच्या १०५ एमएलडी पाण्यापैकी गावांना ६० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित ४५ एमएलडी पाणी गावांना देण्यास पाटबंधारे विभागाची हरकत नाही. एमआयडीसी या संदर्भात निर्णय घेऊ शकते. – के. एम. महाजन,कार्यकारी अभियंता , ठाणे पाटबंधारे विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply to mhada colony in khoni caused intense resentment in 27 villages amy
First published on: 13-08-2022 at 11:53 IST