येऊरच्या धरणातून ठाण्याला पाणीपुरवठा? ; दुर्लक्षित धरणाच्या डागडुजीसाठी हालचाली

या मागणीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने मंजुरी देत या धरणाची पाहणी करण्याचे आदेश दिले.

ठाणे : ठाणे शहराची झपाटय़ाने वाढलेली लोकसंख्या आणि तुलनेत कमी होणाऱ्या पाणी पुरवठय़ामुळे शहरात वर्षभर अनेक ठिकाणी टंचाईसदृश्य परिस्थिती असते. नुकत्याच झालेल्या जलसंपदा मंत्र्यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊरच्या दुर्लक्षित बंधारावजा धरणाच्या पाहणीची मागणी केली होती. अखेर जलसंपदा विभागाने या छोटय़ा धरणाची पाहणी केली असून त्याची लवकरच डागडुजी केली जाणार आहे.

आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील पाणीपुरवठय़ाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंचन भवनात बैठक घेतली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाणीटंचाईबाबत गाऱ्हाणे मांडले होते. एकनाथ शिंदे यांनी येऊर भागात जुन्या काळातील एक बंधारावजा धरण असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या धरणाची दुरुस्ती केल्यास मोठा पाणीसाठा उपलब्ध होईल, त्यामुळे याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने करावा, अशी मागणी   यावेळी शिंदे यांनी केली. या मागणीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने मंजुरी देत या धरणाची पाहणी करण्याचे आदेश दिले.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच याची पाहणी केली. या पाहणीत धरणाच्या भिंती सक्षमपणे उभ्या असल्याचे दिसून आले. मात्र दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची मोठय़ा प्रमाणावर डागडुजी करावी लागणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. भिंतींच्या खालून गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे, तर दोन भिंतींमध्ये पाणी अडण्याची व्यवस्था नसल्याने पाणी अडवता येत नाही. हे धरण वन विभागाच्या अखत्यारित असल्याचेही आढळून आले आहे.

या परिसराला पाणीपुरवठा वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाचे सर्वप्रथम हस्तांतर करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच  जलसंपदा  विभाग या धरणाची दुरुस्ती करू शकेल. या धरणाची उंची वाढवण्याची शक्यता आहे. ती वाढल्यास त्यात अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल. येथे पाणीपुरवठा योजना राबवल्यास उपवन, शिवाईनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर या भागांना पाणीपुरवठा करता येणार आहे

येऊर परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडतो. तिथे काही जुने बंधारेही असून त्यांची डागडुजी केली तर ठाण्यासाठी पाण्याचा एक शाश्वत स्रोत निमाण होऊ शकतो. ठाण्याची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता अशाच प्रकारे स्रोत विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply to thane from yeoor dam zws

ताज्या बातम्या