ठाण्यात आज पाणीपुरवठा सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात म्हणून दर बुधवारी बंद ठेवण्यात येणारा ठाणे शहरातील पाणीपुरवठा आजच्या बुधवारी मात्र सुरळीत राहणार आहे…

गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात म्हणून दर बुधवारी बंद ठेवण्यात येणारा ठाणे शहरातील पाणीपुरवठा आजच्या बुधवारी मात्र सुरळीत राहणार आहे. तांत्रिक बिघाडाच्या घटनांमुळे गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस ठाणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर, बुधवारी १० जून रोजी शहरामध्ये कुठेही पाणीपुरवठा बंद केला जाणार नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.
कळवा लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने गेल्या पाच महिन्यांपासून १४ टक्के पाणीकपात करण्यात येत असल्याने दर बुधवारी ठाण्यातील कोणत्या ना कोणत्या भागामध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद केला जातो. मागील आठवडय़ात बुधवारी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेतला गेला होता. मात्र त्याच वेळी स्टेमचा पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खंडित झाल्याने शहरातील अध्र्याहून अधिक भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असा सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहून नागरिकांना मोठा फटका बसला होता.
गेल्या आठवडय़ात नागरिकांचे झालेले हाल लक्षात घेता स्टेमच्या वतीने या आठवडय़ातील बुधवारचा शटडाऊन पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना या आठवडय़ात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Water supply wont be shut down in thane

ताज्या बातम्या