scorecardresearch

आठवडय़ाची मुलाखत : सांस्कृतिक कट्टे जागोजागी सुरू व्हावेत!

ठाणे शहराची ओळख ही सांस्कृतिक शहर अशीच राहिली आहे.

संपदा वागळे, आचार्य अत्रे कट्टय़ाच्या संस्थापिका

ठाणे शहराची ओळख ही सांस्कृतिक शहर अशीच राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शहरात सांस्कृतिक कट्टय़ांची परंपरा खोलवर रुजली आहे. ठाणेकरांचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून या कट्टय़ांकडे येथील नागरिक पाहतात.  सद्य:स्थितीला करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने शहरात विविध भागातील कट्टे पुन्हा बहरू लागले आहेत. वेगवेगळय़ा कार्यक्रमांसाठी आसुसलेले ठाणेकरही या कट्टय़ावर मोठय़ा उत्साहाने हजेरी लावू लागले आहेत. या उत्साहवर्धक वातावरणाबाबत ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ाच्या संस्थापिका संपदा वागळे यांच्याशी केलेली बातचीत..

* करोनाकाळात सांस्कृतिक विश्वाला कसा फटका बसला ?

 गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कट्टय़ांद्वारे दर आठवडय़ाला विविध विषयांवरील कार्यक्रम आयोजित केले जायचे. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद असायचा. त्यामुळे कट्टय़ाच्या सदस्यांबरोबरच प्रेक्षक वर्गाला देखील या कार्यक्रमांसाठी कट्टय़ांवर नियमित हजेरी लावण्याची सवय झाली होती. करोनामुळे यामध्ये खंड पडला. सुरुवातीचे तीन महिने कट्टय़ावर कोणतेच कार्यक्रम राबविले गेले नाहीत. त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आम्हाला फोनवरून संपर्क साधून ऑनलाइन व्यासपीठावर कट्टा सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार आम्ही ऑनलाइन व्यासपीठावर कट्टा सुरू करण्याची तयारी केली. कट्टय़ाचे सदस्य प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक असल्याने आम्हाला ऑनलाइन कट्टा सुरू करण्यासाठी तांत्रिक गोष्टी शिकणे खूप गरजेचे होते. या सर्व तांत्रिक बाबी या काळात अवगत करून प्रेक्षकांसाठी आम्ही ऑनलाइन कट्टा पुन्हा जोमाने सुरू केला.

* या काळात प्रेक्षक वर्ग जोडून ठेवण्यासाठी काय करावे लागले ?

खरे सांगायचे तर प्रेक्षक वर्ग जोडण्यासाठी अशी मोठी कसरत करावीच लागत नाही. ठाणेकरांची स्वत:ची अशी एक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांची गरज असते हे लक्षात घ्यायला हवे. करोनाकाळात सुरुवातीचे काही महिने कट्टा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून जोडले गेलेले काही प्रेक्षक आमच्यापासून काही काळ दुरावले होते. मात्र, आम्ही करोनाकाळात तांत्रिक गोष्टी अवगत केल्याने व्हॉट्स अ‍ॅपवर कट्टय़ाच्या सदस्यांसोबतच प्रेक्षक वर्गाचा एक समूह तयार केला. त्या समूहामध्ये कट्टय़ांविषयी माहिती, कार्यक्रमांची माहिती तसेच इतर चर्चा यामध्ये होत होत्या.

शिवाय ऑनलाइन व्यासपीठावर समाजातील तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित केले होते. प्रत्यक्ष जरी संवाद होत नसला तरी ऑनलाइनच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाशी संवाद सुरू झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग जोडला गेला.

*  ऑनलाइनच्या माध्यमातून सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम तितकेच प्रभावी ठरतात का ?

अनेक वर्षे सांस्कृतिक कट्टे प्रत्यक्ष भरविले जात असल्याने कट्टय़ांवर जमणारी मैफील, त्यातून प्रेक्षकांशी होणारा प्रत्यक्ष संवाद यांची एक वेगळी गंमत होती. मात्र, ऑनलाइन कट्टे जेव्हा सुरू केले. तेव्हा सुरुवातीला ऑनलाइन कार्यक्रम तास- दोन तास पाहणे प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटत होते. हळूहळू प्रेक्षकांना देखील ऑनलाइन कट्टयाची सवय होत गेली. खरे तर सुरुवातीला प्रेक्षकांचा प्रतिसाद असेल की नाही, असा प्रश्न आम्हाला होता. मात्र, प्रेक्षकांना घरबसल्या विविध कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळत आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील प्रेक्षकांनाही ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमांचा आनंद लुटता येतो.  त्याचबरोबर ऑनलाइनच्या माध्यमातून प्रसारित झालेले कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या सवडीनुसारही पाहायला मिळतात. त्यामुळे ऑनलाइन माध्यम हे देखील तितकेच प्रभावी माध्यम आहे.

*  सद्य:स्थितीला शहरातील सांस्कृतिक कट्टय़ांची काय परिस्थिती ?

शहरात सद्य:स्थितीला साधारण १० सांस्कृतिक कट्टे असून ते एकमेकांपासून लांब अंतरावर आहेत. त्यामुळे कट्टयांवर पोहोचण्यासाठी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी शहरात जागोजागी विविध कट्टे सुरू व्हायला हवेत आणि कट्टय़ांची संख्या आणखी वाढवायला हवी. जेणेकरून नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळेल आणि त्याची पायपीट होणार नाही. यासाठी ठाणे महापालिकेकडून पाठबळ मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

* तरुण वर्गानी सांस्कृतिक कट्टय़ाकडे वळावे, यासाठी कोणते प्रयत्न करत आहात ?

तरुण वर्गासाठीही कट्टय़ांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, ही मंडळी केवळ एकांकिका, गाण्यांचे सादरीकरण अशा कार्यक्रमांनाच प्रामुख्याने हजेरी लावत असतात. व्याख्यान, कथन अशा कार्यक्रमांना तरुण वर्ग नसतो. त्यामुळे तरुण वर्गाची आवड, निवड याचा शोध घेऊन तरुणांसाठी आगामी विविध कार्यक्रम करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर तरुणांनी देखील या कट्टय़ांची परंपरा कायम ठेवण्यासाठी स्वत:हून पुढे येणे तितकेच गरजेचे आहे.

मुलाखत : आकांक्षा मोहिते

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weekly interviews cultural interviews cultural city tradition of kattas ysh

ताज्या बातम्या