यात्रा, सण, उत्सव साजरे करण्यावर र्निबध असताना बाजारहाट सुरूच

लोकसत्ता वार्ताहर

वसई: विविध ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे करोनासंसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने नुकताच प्रशासनाने यात्रा, सण, उत्सव साजरे करण्यावर र्निबध घातले आहेत. असे जरी असले तरी शहरातील व गावातील विविध ठिकाणचे आठवडे बाजारात होणाऱ्या गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुन्हा करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

वसई- विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात आठवडे बाजार भरविले जातात. या बाजारात विविध ठिकाणाहून विक्री करण्यासाठी येणाऱ्या फेरीवाल्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. टाळेबंदीच्या काळात हे बाजार बंद ठेवण्यात आले होते. याचा मोठा परिणाम हा फेरीवाले, छोटे-मोठे विक्रेते यांच्यावर परिणाम झाला होता. करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा शहरी व ग्रामीण भागात आठवडे बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे.

परंतु मागील महिनाभरापासून पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि प्रशासनाने कडक र्निबध लागू करून कारवाईला सुरुवात केली. असे असले तरी आठवडे बाजारात मोठी गर्दी जमत असल्याचे चित्र दिसून आले आहे. एका आठवडी बाजारात साधारणपणे हजारोच्या संख्येने नागरिक एकत्र येत आहेत. यात काही नागरिक मुखपट्टी विना फिरतात, तर दुसरी सामाजिक अंतराचे नियमही पाळले जात नाहीत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होण्याची शक्यता आहे. वसई- विरार शहरात काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास ही खुल्या जागेत बाजार भरविले जात आहेत त्याठिकाणीही मोठी झुंबड होत असते.

जमाव बंदीचे तीनतेरा

वसई विरार शहरात पुन्हा करोनाचा प्रसार न होण्यासाठी नागरिकांनी जास्त संख्येने एकत्रित जमू नये यासाठी कडक र्निबध घातले आहेत. यामध्ये सुरू केलेल्या शाळा बंद केल्या तर सण, उत्सव साजरे करण्यावर ही बंदी घातली आहे. त्यातच लग्न सोहळे या ठिकाणीसुद्धा मोजक्याच नागरिकांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले पाहिजे असे आदेश देण्यात आले आहे. परंतु बाजाराची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी आदी ठिकाणच्या भागात  कोणतेही र्निबध नसल्याने अशा ठिकाणी सर्रासपणे नागरिक एकत्र जमतात. यावर नियंत्रण ही मिळविले जात नसल्याने मोठय़ा संख्येने एकत्रित जमण्याचे प्रमाण वाढत असल्याने जमाव बंदीचे तीन तेरा झाल्याचे चित्र दिसून येत आहे.