डोंबिवली- सुंगधित द्रव्य तयार करण्यासाठी उपयुक्त असलेली व्हेल माशाची एक कोटी ६० लाख रुपये किमतीची  उलटी पोलिसांच्या विशेष पथकाने डोंबिवलीतून जप्त केली आहे. या उलटीची तस्करी करणाऱ्या दोन जणांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पोलीस उपायुक्तांचे विशेष पथक आणि रामनगर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन मिळालेल्या गुप्त माहिती वरुन गुरुवारी ही कारवाई केली आहे. नंदू राय (२८), अर्जुन निर्मल (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी उल्हासनगर मधील रहिवासी आहेत.

गेल्या काही वर्षापासून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी काही तस्कर करत आहेत. या तस्करीतून कोट्यवधीची कमाई होत असल्याने शहरी भागातील तरुण या बेकायदा व्यवसायात उतरले आहेत. व्हेल माशाच्या उलटीचा सुंगधित द्रव्य, अत्तरे तयार करण्यासाठी उपयोग केला होता. या कामासाठी काही व्यावसायिक बेकायदा उलटीचा वापर करत आहेत. उघडपणे उलटीचा वापर करता येत असल्याने गुप्तपणे उलटीची तस्करी केली जात आहे. बेरोजगार तरुण यांचा या कामासाठी सर्वाधिक वापर केला जातो, असे पोलीस सुत्राने सांगितले.

डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडा संकुल भागातील बंदिश हाॅटेल परिसरात काही तरुण व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती कल्याण पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. विक्रीसाठी येणारे तरुण पळून जाऊ नयेत म्हणून तगडा बंदोबस्त असावा म्हणून विशेष पथकाने रामनगर पोलिसांचे साहाय्य या कामासाठी घेतले. बंदिश हाॅटेल परिसरात रात्री ११ वाजता सापळा लावला. साध्या वेशातील पोलीस या भागात तैनात होते. रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान एक तरुण, त्याच्या पाठोपाठ हातात पिशवी असलेला दुसरा तरुण सापळा लावलेल्या भागात घुटमळू लागले. त्यांच्या हालचालींवर पोलिसांची पाळत होती.

बराच उशीर दोन्ही तरुण एकमेकांना इशारे करत ग्राहकाचा शोध फिरत असतानाच, हेच आरोपी असावेत असा अंदाज करुन एका साध्या वेशातील पोलिसाने पुढे होऊन एका तरुणाला तुम्ही येथे काय करता असा प्रश्न केला. त्यावेळी तो व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही. पिशवीत काय आहे याचीही माहिती तो देऊ शकला नाही. पोलिसाने इशारा करताच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी घुटमळत असलेल्या दोन्ही तरुणांवर झडप घालून त्यांना अटक केली. पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांच्या पिशवीत एक कोटी ६० लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी आढळून आली. या दोघांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही उलटी कोठुन आणली. ती कोणाला विक्री केली जाणार होते. या दोन्ही तरुणांकडील मोबाईल, त्यामधील संपर्क कर्मांक या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whale vomit worth 1 5 crore seized in dombivli zws
First published on: 19-08-2022 at 15:10 IST