बदलापूर - राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवित आहे. मात्र विरोधकांनी या योजनेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे हा शब्द पाळणारा भाऊ आहे विरोधकांसारखा सावत्र भाऊ नाही. विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न करूनही आम्ही योजना यशस्वीपणे राबवून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे आता महिलांना देखील आपलं लाडकं सरकार लक्षात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांना आणि नागरिकांना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते गुरुवारी कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या प्रशस्त अशा नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. हेही वाचा - कल्याणमध्ये आवडीचे जेवण करत नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात कढई मारली देशाचा विकास हा गतीने होत असून विकासाची पहाट दाखवणारा स्वातंत्र्य दिन आज आपण पाहत आहोत. भारताचा विकास महाराष्ट्राच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. आपला महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे आहे कारण आपल्या सरकारने विकासाला प्राधान्य दिले आहे. येणाऱ्या काळातही अधिक गतीने विकासासाठी आपले सरकार काम करणार असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महायुती सरकार राज्यातील जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबवत असून या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत बुधवारी ३३ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर गुरुवारी ८० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. विरोधकांनी अपप्रचार केला की जमा झालेले पैसे काढून टाकण्यात येतील. मात्र आमची देना बँक आहे लेना बँक नाही असा टोला लगावत या आधीचे सरकार हे हफ्ते वसुली करणारे सरकार होते मात्र आमचे सरकार हे गरजूंच्या खात्यात हफ्ते भरणारे सरकार आहे अशी टीका देखील केली. तर लाडकी बहीण योजना ही कधीही बंद पडणार नाही त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी योजनेची बदनामी करत त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हेच खोडा घालणारे विरोधक तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना जोडा दाखवा. तर कोट्यवधी रुपयांमध्ये लोळणाऱ्या विरोधकांना दीड हजार रुपयांचे मोल नाही कळणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. हेही वाचा - मुंब्य्रातील तिरंगा मिरवणुकीत टिपू सुलतानचे पोस्टर, स्वातंत्र्यदिनानिमित्त एसडीपीआयने काढली होती मिरवणूक तुम्ही सांगाल तेव्हा महापालिका बदलापूर महापालिकेचे हे नवे प्रशासकीय भवन शहराचा कारभार चालविण्यासाठी बहुपयोगी ठरणार आहे. बदलापूर, अंबरनाथ या शहरांचा विकास होतो आहे. मुंबई आणि ठाणे येथील नागरिक या शहरांमध्ये राहण्यास पसंती देत आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरातील लोकप्रतिनिधींनी एकमताने सांगितल्यास दोन्ही शहरांची मिळून महापालिका स्थापन करण्यात येईल. महापालिका झाल्यास विकासाची अधिक दालने खुली होतील. यामुळे तुम्ही सांगा तेव्हा महापालिका स्थापन करू, अशी स्पष्टोक्ती देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.