लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. गृहमंत्रीपद भाजपकडे आहे. अशा परिस्थितीत डोंबिवलीसारख्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सुसंस्कृत, सुशिक्षितांच्या शहरातील एका ज्येष्ठ भाजप पदाधिकाऱ्यावर एक पोलीस अधिकारी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धाडस करत असेल तर ती सत्ता काय कामाची, असा संतप्त प्रश्न आज कल्याण पूर्वेतील एका कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक गुरुवारी सकाळी कल्याण पूर्वेतील तिसाई सभागृहात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.

आणखी वाचा-ठाणे: शिळफाटा येथे रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात कोणीही भाजप पुरुष, महिला पदाधिकारी गेली की तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे त्या पदाधिकाऱ्याचे काहीही ऐकून न घेता त्याला लक्ष्य करतात. एका पोलीस ठाण्याच्या एक प्रमुख अधिकारी अशाप्रकारे वर्तन करत असेल तर त्याला कोणाचा तरी पाठबळ असल्या शिवाय तो एवढा हेकेखोरपणा करू शकणार नाही. अशा अधिकाऱ्याला धडा शिकविण्याची आणि त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय व्यक्तिला धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असा इशारा देण्यात आला. या टिकेचा रोख शिवसेनेचा एक नेता होता.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरुध्द आक्रमक पवित्रा घेण्याची भाषा केल्याने सेना-भाजप मधील तणाव वाढल्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत सत्तेमधील भागीदार म्हणून संयम आणि शांतता कितपत सहन करायची. ही भूमिका घेऊन आता भाजप पदाधिकारी अडचणीत येऊ लागले. राज्यात सत्ता आणि गृहमंत्री पद भाजपकडे असुनही भाजप पदाधिकाऱ्यांना न्याय मिळणार नसेल. पदाधिकाऱ्या बरोबर भाजपची बदनामी होत असेल तर राज्यातील सत्ता तरी मग काय कामाची, असा प्रश्न भाजपचे प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले यांनी केला.

सेनेवर बहिष्कार

खा. शिंदे यांच्या दबावावरुनच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खास समर्थक नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची तीव्र भावना भाजप पदाधिकाऱ्यांची झाल्याने यापुढे कल्याण डोंबिवली परिसरातील शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भाजपच्या कल्याण जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दिवा येथील विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या फलकावर मंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छब्या लावण्यात आल्या नव्हत्या. त्याचा निषेध म्हणून कल्याण डोंबिवली, दिवा परिसरातील एकही भाजप कार्यकर्ता दिवा येथील कार्यक्रमाला गेला नाही. मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या कार्यक्रमाककडे पाठ फिरवली. संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत करुन खा. शिंदे यांनी भाजप, मनसेच्या नेत्यांना डिवचल्याने त्यांच्या विरुध्द तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बागडे यांच्या विरुध्द दोन पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. ही प्रकरणे धसास लावण्यासाठी भाजप पदाधिकारी सरसावले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the use of government if false cases are filed against office bearers question by bjp office bearer mrj
First published on: 08-06-2023 at 13:59 IST