Who is Dr Mahesh Bedekar?: गणेशोत्सवानिमित्ताने डिजे आणि कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांविरोधात पुण्यातील सजग नागरिक विद्यानंद बापट यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांनी सांस्कृतीक पद्धतीने उत्सव कसा साजरा करतात हे दाखवून द्यावे असे आवाहन नुकतेच केले. उत्सवातील दणदणाट, ध्वनी प्रदुषण यासंबंधी अनेक कठोर कायदे यापुर्वी न्यायालयाकडून अग्रेक्षीत करण्यात आले आहे. नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या या दणदणाटाविरोधात ठाण्यातील डाॅ.महेश बेडेकर यांनी मोठा न्यायालयीन लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयात ध्वनी प्रदुषण नियम अंमलबजावणी, रस्ते अडवून साजरे होणारे सण-उत्सवांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेली याचिका गाजली. त्यावर न्यायालयाने दिलेले निर्देशांच्या आधारे संपुर्ण राज्यात सण-उत्सवांसाठी नियमावली लागू झाली आहे.
कोण आहेत डाॅ.बेडेकर ?
ठाण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, लॅपरोस्कोपिक सर्जन आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून डॉ. महेश बेडेकर यांची ओळख आहे. प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्रातील एमडी शिक्षण घेतलेल्या बेडेकर यांना या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. ठाणे येथील गावदेवी परिसरातील डॉ. बेडेकर हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या माध्यमातून ते वैद्यकीय सेवा देतात. वैद्यकीय क्षेत्रासोबतच ध्वनीप्रदूषण आणि सार्वजनिक नियमांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयीन लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते व याचिकाकर्ते म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. सण-उत्सवांचा आनंद घ्या, मात्र त्याचे रूपांतर उन्मादात होऊ देऊ नका, अशी भूमिका घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून ध्वनिप्रदूषण, सार्वजनिक रस्त्यांवरील मंडप, वाहतुकीतील अडथळे आणि उत्सवांमधील नियमभंगाविरोधात डॉ. महेश बेडेकर हे आवाज उठवत आहेत.
डाॅ. बेडेकर यांचा न्यायालयीन लढा का गाजला ?
सुरुवातीला महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे त्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली. तब्बल दहा वर्षे ही याचिका चालली. या काळात सण-उत्सव, सार्वजनिक रस्ते, ध्वनी प्रदूषण, वाहतूक व्यवस्था, मंडपांना परवानगी अशा विविध मुद्द्यांवर सखोल ऊहापोह झाला. माजी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. रस्ते किती अडवता येतील, मंडपांना परवानगी देताना कोणते निकष असावेत, वाहतुकीचे नियोजन कसे केले जावे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन कसे व्हावे, यांसह अनेक महत्त्वाचे मुद्दे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या या न्यायालयीन लढ्यामुळे ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि उत्सवांतील नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला. याशिवाय, धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकर, फेरिवाला धोरण, गावदेवी मैदान आणि मतदानासाठी नोटा चा अधिकार अशा याचिकाही त्यांनी आतापर्यंत दाखल केल्या आहेत. त्यात न्यायालयाने महत्वाचे निर्देशही दिले आहेत.
ध्वनी प्रदुषण जनहित याचिका कशी दाखल झाली ?
ठाणे येथील गावदेवी परिसरात डॉ. बेडेकर यांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या परिसरात एक सभागृह आहे. याठिकाणी होणारे लग्नसोहळे तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन केले जात होते. त्याचा त्रास नागरिकांना व्हायचा. त्यांच्या रुग्णालयाच्या परिसरातील मोठ्या आवाजाच्या कार्यक्रमांमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचा अभ्यास करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. २०१० मध्ये त्यांनी राज्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीची याचिका न्यायालयात दाखल केली. या प्रकरणात २०१२ आणि २०१६ मध्ये महत्त्वपूर्ण न्यायालयीन आदेश झाले. शहरातील शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले. उत्सवस्थळी ध्वनी मापन करणे आणि प्रदुषण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली.
रस्ते अडवून उत्सव नको
ठाणे शहरात गेल्या १५ ते १६ वर्षांपासून मोठमोठ्या रक्कमेची बक्षिसे असलेल्या दहीहंड्यांचे आयोजन केले जात आहे. साहसी खेळ म्हणून राजकीय नेते त्याला प्रोत्साहन देत आहेत. मात्र, हा साहसी खेळ मैदानात खेळण्याऐवजी रस्ते अडवून खेळला जात होता. तसेच गणेशोत्सवांसाठीही रस्ते अडवून मंडप उभारण्याची प्रथा शहरात सुरू झाली. सण-उत्सवांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक, डीजे, मिरवणुका आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे यामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा लक्षात घेऊन डाॅ. बेडेकर यांनी २०१२ मध्ये दुसरी याचिका दाखल केली. यात उत्सवांसाठी नियमावली लागू करण्याची मागणी केली. या याचिकांमुळे प्रशासनाच्या जबाबदारीचा मुद्दाही न्यायालयीन पातळीवर चर्चेत आला आणि संपुर्ण राज्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सण-उत्सव नियमावली लागू झाली.
नियम अंमलबजावणीसाठी आग्रह का धरला जातोय ?
गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव किंवा दिवाळीच्या काळात ध्वनीची पातळी, रस्त्यांवरील मंडप आणि वाहतूक यासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी हा डाॅ. बेडेकर यांच्या कामाचा प्रमुख विषय राहिला आहे. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्देश दिल्यानंतरही प्रत्यक्ष उत्सवांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा बेडेकर सातत्याने उपस्थित केले. उत्सवांच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी ध्वनीची पातळी मोजून त्याची आकडेवारीही समोर आणली होती. २०२३ मध्ये गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांदरम्यान ठाण्यात आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच २०१७ मध्येही ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन न झाल्याने त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची भूमिका घेतली होती. ध्वनिप्रदूषणाविरोधात बोलणे म्हणजे धर्मविरोधी भूमिका नव्हे, असे त्यांचे म्हणणे आहे. सण साजरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र त्या आनंदामुळे दुसऱ्या नागरिकाच्या शांततेचा, आरोग्याचा किंवा सुरक्षिततेचा अधिकार बाधित होऊ नये, हा त्यांच्या भूमिकेचा गाभा आहे. यातूनच ते ‘सण-उत्सवांचा आनंद हवा, उन्माद नको’ असा आवाहन सातत्याने करत आहेत.
