ठाणे : राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) कडून जाहीर झालेल्या उमेदवारीने राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी अचानक धक्कातंत्राचा अवलंब करत पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामागे केवळ एका व्यक्तीला संधी देण्यापेक्षा व्यापक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

डॉ. ज्योती वाघमारे या उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. इंग्रजी साहित्यात पीएचडी केलेल्या आणि सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी असलेल्या वाघमारे यांना उमेदवारी देत एकनाथ शिंदे यांनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याची भूमिका अधोरेखित केली आहे. गेल्या काही काळात ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ अशी प्रतिमा निर्माण करत महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या शिंदे यांच्या राजकारणाला या निर्णयातून आणखी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

तसेच मोठ्या राजकीय घराण्यातील नसलेल्या, तळागाळातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला राज्यसभेसारख्या उच्च सभागृहाची उमेदवारी देत शिवसेनेत घराणेशाहीला स्थान नसून सामान्य कार्यकर्त्यांनाही मोठ्या संधी मिळू शकतात, असा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येतो. शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष म्हणून असलेली प्रतिमा कायम ठेवण्याचाही हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

डॉ. ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतून मागासवर्गीय आणि दलित समाजालाही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक समतोल साधण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः आंबेडकरी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आणि समाजाशी संवाद वाढवण्याचा राजकीय संदेशही यातून दिला गेल्याची चर्चा आहे. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले तर वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. पश्चिम महाराष्ट्र पारंपरिकरीत्या इतर पक्षांचा प्रभाव असलेला प्रदेश मानला जातो. अशा परिस्थितीत त्या भागातील चेहरा पुढे करत शिवसेनेला तेथे संघटनात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून करण्यात आला आहे.

मागील काही वर्षांत विविध टीव्ही चर्चासत्रे, राजकीय व्यासपीठे आणि सभांमधून आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांनी पक्षनिष्ठा दाखवली आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देत पक्षासाठी आक्रमकपणे काम करणाऱ्यांना योग्य सन्मान दिला जातो, असा संदेश देण्याचाही प्रयत्न या निर्णयातून झाल्याचे मत स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.

एकूणच पाहता डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा केवळ राजकीय गणिताचा भाग नसून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार, सामाजिक प्रतिनिधित्व, कार्यकर्त्यांना संधी आणि पश्चिम महाराष्ट्रातील संघटन विस्तार या सर्व बाबींचा विचार करून घेतलेला रणनीतिक निर्णय असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.