वसई-विरारमध्ये पालिकेचा अनोखा प्रयोग

वातानुकूलित शौचालय आणि तेही वायफाय सुविधा असलेले.. वसई-विरार शहरात अशा प्रकारचे अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. वसई-विरार महापालिका अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबविणार आहे. खाजगी स्वयंसेवी संस्थामार्फत ही वातानुकूलित शौचालये बांधली जाणार आहेत. प्रशस्त असणाऱ्या या शौचालयांमध्ये वायफायची सुविधाही मोफत उपलब्ध असणार आहे.

वातानुकूलित शौचालयाचे कंत्राट एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्पात शहरातील ३५ प्रमुख ठिकाणी ही शौचालये बांधली जाणार आहेत. वातानुकुलीत शौचालय उभारणे आणि नंतर त्याची देखभाल करणे हा सगळा खर्च ही संस्था करणार आहे. पालिका संस्थेला जागा उपलब्ध करून देणार आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर ही शौचालये बांधली जाणार आहेत. विरार रेल्वे स्थानकाजवळ पहिले वातानुकूलित शौचालय तयार होत असून येत्या दहा दिवसांत ते नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.

शहरात २८०० शौचालये

सध्या वसई-विरार शहरात दोन हजार ८०० शौचालये असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र त्यांची अवस्था बिकट आहे. पालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील १५ हजार कुटुंबाकडे स्वत:चे शौचालय नाही. त्यापैकी १३ हजार ३३८ कुटुंबाकडे शौचालये बांधण्यासाठी स्वत:ची जागा आहे. त्यांना २० हजार रुपये देऊन शौचालय बांधले जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार राज्य सरकार, ४ हजार केंद्र सरकार आणि उर्वरित ८ हजार रुपये महापालिका देणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही शौचालये बांधली जाणार आहेत.

शौचालयात काय?

वातानुकूलित, वायफाय सुविधा, बसण्यासाठी वेटिंग रूम, अंतर्गत सजावट अत्याधुनिक, आकर्षक दिवे.

वसई-विरार शहरात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. शौचालयासाठी तीन रुपये तर अंघोळीसाठी पाच रुपये दर आकारला जाणार आहे. त्याची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटी संस्था करणार आहे. त्यामुळे पालिकेवर त्याचा कुठलाही आर्थिक बोजा पडणार नाही. या वातानुकूलीत शौचालयाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविली जाईल.

– लाड, पालिकेचा कार्यकारी अभियंता.