वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल | Loksatta

वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल

वसईमध्ये ‘नेस्ट’ या पक्षिमित्र संस्थेतर्फे नुकतीच पक्षिगणना करण्यात आली

वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल
पक्षिगणनेत ११० विविध पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

पक्षिगणनेत ११० प्रजातींच्या नोंदी; निवासी, प्रवासी पक्ष्यांचा समावेश

निसर्गरम्य वसई परिसरात हिवाळी पक्षी दाखल झाले असून नुकत्याच झालेल्या पक्षिगणनेत ११० विविध पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अनेक निवासी पक्षी आणि प्रवासी पक्ष्यांचा समावेश आहे.

वसईमध्ये ‘नेस्ट’ या पक्षिमित्र संस्थेतर्फे नुकतीच पक्षिगणना करण्यात आली. वसईतील कळंब, राजोडी, अर्नाळा, रानगाव, भुईगाव, मामाची वाडी, श्रीप्रस्थ, गोगटे सॉल्ट, राजीवली व तुंगारेश्वर अभयारण्य परिसर या ठिकाणांना पक्षिमित्रांनी भेट देऊन त्यांनी तेथील पक्षी प्रजातींच्या नोंदी घेतल्या. या वेळी दिसलेल्या पक्षी प्रजातींची नावे, त्यांची संख्या नोंदवून ती ‘ई बर्ड’ या सांकेतिक स्थळावर नोंदवण्यात आली. मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी मोठय़ा संख्येने पाहावयास मिळाले. त्यात स्थलांतरित पक्षी, स्थानिक पक्षी, प्रवासी पक्षी दिसून आल्याचे नेस्टचे अध्यक्ष आणि पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले.

  हे पक्षी आढळले

गल, चिलखे, तुताऱ्या, दलदली हारीन, दगडी गप्पीदास, युरेशियन कल्र्यू, व्हिम्बरेल, ऑइस्टर केचर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताऱ्या, गरुड, ससाणे, घार, खंडय़ा, बगळे, राखी बगळे, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे, वटवटय़ा, बुलबुल, युरेशियन काल्र्यू, तुतारी, सुरय, कोतवाल, महाभृंगराज, कोकीळ, मैना, चिमण्या, भारद्वाज, हळद्या, दयाळ, तांबट.

साधारणत: ११० प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. गणनेमुळे पक्ष्यांची परिस्थिती समोर येतेच, पण पक्षी हा निसर्गाच्या आरोग्याचा निदर्शक असल्याने अशा गणनेमुळे पर्यावरणीय सद्य:स्थितीही कळते. कोणत्या प्रकारचे पक्षी या कालावधीत दाखल झाले आहेत हे समजते.

– सचिन मेन, पक्षी अभ्यासक

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2017 at 01:40 IST
Next Story
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला हक्काचा निवारा