बदलापूर नवे थंड हवेचे ठिकाण

उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा घसरला असून मुंबई महानगर प्रदेशात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

दुसऱ्यांदा पारा ९ अंशाखाली, मंगळवारी ८.९ अंश सेल्सियसची नोंद

बदलापूर : उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा घसरला असून मुंबई महानगर प्रदेशात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शहरात मंगळवारी सकाळी ८.९ अंश सेल्सियसची नोंद झाली. खासगी हवामान अभ्यासकांनी केलेल्या नोंदीनुसार मुंबई महानगर प्रदेशात सर्वात थंड शहर म्हणून नोंदवले गेले आहे. पंधरा दिवसांपूर्वीही बदलापूर शहराचा पारा ९ अंशावर आला होता.

गेल्या काही महिन्यांमध्ये वातावरणातील बदलांमुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी इराण आणि बलुचिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबईपासून ते थेट नाशिकपर्यंत धूळयुक्त वातावरण जाणवले होते. धुळीचे प्रमाण इतके होते की, त्यामुळे दृश्यमानता घटल्याचे दिसून आले होते. या धुळीच्या वादळाचा परिणाम सोमवारी काही अंशी घटल्यानंतर तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली. उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली गेली आहे.

निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहरात मंगळवारी गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. मंगळवारी बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत शहराचे तापमान ८.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये सर्वात कमी नोंदवले गेलेले तापमान हे बदलापूर शहरातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पश्चिम विक्षोप आणि नंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव आहे. येत्या दोन दिवसांनंतर पुन्हा तापमान सर्वसाधारण अंश सेल्सियसवर येऊन थांबेल.

– अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यास, कोकण हवामान

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Winter place new cool air ysh

Next Story
कळवा तिसऱ्या खाडी पुलाची प्रतीक्षा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी