आभासी चलनात गुंतवणूक केल्यास मासिक १५ ते ५० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल असे सांगून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या बबिता कुमार (३१) हिला ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने दिल्ली येथून अटक केली आहे. बबिता हिचा बॅंक तपशील पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये सुमारे अडीच कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

फसवणूक झालेले तक्रारदार हे कल्याण भागात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना टेलेग्राम या समाजमाध्यमावर मायवॅालेट ट्रेडिंग प्रायव्हटे लिमीटेड नावाची एक कंपनी आढळून आली होती. या कंपनीच्या माध्यमातून आभासी चलनात गुंतवणूक केल्यास मासिक १५ ते ५० टक्क्यांचा परतावा मिळेल असे सांगितले जात होते. त्यामुळे तक्रारदार आणि त्यांच्यासह तीन जणांनी सुमारे साडेसात लाख रुपये गुंतविले होते. महिने उलटूनही त्यांना परतावा मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा समांतर तपास सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाकडून सुरू होता. दरम्यान, यातील मुख्य सुत्रधार बबिता कुमार ही दिल्ली येथे राहत असून युट्यूब आणि टेलेग्राम अॅपच्या माध्यमातून ती गुंतवणूकदारांना आकर्षक योजना सांगून अमीष दाखवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तिला दिल्ली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तिच्या बॅंक खात्यात अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी ठाणे पोलिसांतकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.