पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा; मारहाण करणाऱ्या महिलांचा शोध सुरू

जागेच्या वादातून प्रवाशांना मारहाणा होण्याच्या घटना पश्चिम रेल्वेवर वाढत असून बुधवारी वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीला तीन महिलांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. जागेच्या वादातून या महिलांनी या तरुणीला मारहाण केली.

नालासोपारा येथे राहणारी सपना मिश्रा (१९) ही तरुणी बोईसर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गात शिकते. बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी सुटणाऱ्या वांद्रे-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये चढली. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई होती. दुसऱ्या वर्गाच्या डब्यात रिकाम्या असलेल्या आसनावर ती बसली. त्यावेळी तीन महिला आल्या आणि त्यांनी ही आमची जागा आहे, असे सांगून तिला उठवले. या महिला आणि सपना यांच्यात यावरून वाद झाला आणि या महिलांनी सपनाला मारहाण केली. या प्रकारानंतर सपना आणि तिच्या आईने रेल्वे हेल्पलाइनकडे मदत मागितली, मात्र ती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सपनाने महाविद्यालयातून परतल्यानंतर वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. गुरुवारी पोलिसांना या गाडीमध्ये पोलीस पथक पाठवले होते, परंतु मारहाण करणाऱ्या महिला आढळल्या नाहीत, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

रेल्वेगाडीतील मारहाणीच्या घटना

२१ ऑक्टोबर २०१६

  • नव्याने सुरू झालेल्या चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये विरार आणि पालघरच्या प्रवाशांचा वाद. विरारच्या प्रवाशांना विरार स्थानकात उतरू दिले नाही. रेल्वे सुरक्षा बलाचा पालघरच्या प्रवाशांवर लाठीमार.

२८ जुलै २०१६

  • ऋतुजा नाईक ही तरुणीला अन्य प्रवाशांची मारहाण. विरारहून वसईला उतरण्यासाठी अंधेरी लोकलमध्ये चढल्याने वाद. चार महिलांना अटक.