अंबरनाथ एमआयडीसी परिसरात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या तरुणीच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाबाबत आता नवी माहिती समोर येत असून या महिलेवर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचे मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून स्पष्ट होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एमआयडीसी भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अंबरनाथ शहरातील अतिरिक्त औद्योगिक वसाहत ही देशातील एक मोठी वसाहत म्हणून ओळखली जाते. येथे जगभरातील विविध नामांकित कंपन्यांचे प्रकल्प असून दररोज हजारो कामगार, अभियंते येत असतात. त्यात महिलांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या महिलेवर अत्याचार करून मग तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळावर महत्त्वाचे धागेदोरे

महिलेचे शरीर ८२ टक्के जळाल्याने काही अवशेष पोलिसांच्या हाती लागले आहेत. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी दारूच्या बाटल्या, तरुणीचे कपडे आणि रक्त आढळल्याने या महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय बळावला आहे. एमआयडीसीच्या काही भागात रात्रीच्या वेळी अनेक रस्ते निर्मनुष्य असतात. त्याचाच फायदा घेत हा प्रकार झाल्याचा दाट संशय असून त्या अनुषंगाने पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र प्राथमिक तपासानंतर ही धक्कादायक बाब आता समोर आली आहे.