खात्यातून ८० हजार काढले

एटीएम कार्ड कार्यान्वित (अ‍ॅक्टिवेट) करण्यासाठी एटीएम केंद्रात गेलेल्या महिलेच्या खात्यातून दोन अज्ञात इसमांनी तब्बल ८० हजार रुपये काढल्याची घटना मीरा रोड येथे घडली आहे.

क्यारोलील शोलंकी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मीरा रोड येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. खात्याचे एटीएम कार्ड हरविल्याने नवे कार्ड मिळण्यासाठी त्यांनी बँकेत अर्ज केला होता. नवे कार्ड कुरियरने पाठविण्यात आल्यानंतर ते कार्यान्वित करण्यासाठी त्या गेल्या महिन्यात २३ सप्टेंबरला मीरा रोड येथील शांती पार्क भागातील बँकेच्या एटीएम केंद्रात गेल्या. त्या ठिकाणी तीन एटीएम यंत्रे होती. त्यातील एका यंत्रात शोलंकी यांनी आपले कार्ड स्वाइप केले. त्याच वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या इसमाने त्यांनी यंत्रात केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी यंत्रावर असलेले कॅन्सल हे बटन दाबले, हे यंत्र खराब असून तुम्ही बाजूच्या यंत्रावर व्यवहार करा, असा सल्ला या इसमाने शोलंकी यांना दिला. त्यामुळे त्या बाजूच्या यंत्रावर गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे कार्ड स्वाइप करून ते कार्यान्वित केले. त्यानंतर त्यांनी खात्यातून दहा हजार रुपयेदेखील काढले. या वेळी त्यांच्या मागे आणखी दोन इसम उभे होते. पैसे काढल्यानंतर शोलंकी आपल्या घरी गेल्या. त्या वेळी त्यांच्या मोबाइलवर खात्यातून ८० हजार रुपये काढल्याचा संदेश आला.खात्यातून केवळ दहा हजार काढले असताना ८० हजार काढल्याचा संदेश कसा आला याची चौकशी करण्यासाठी त्या पुन्हा बँकेत गेल्या. त्या वेळी शोलंकी यांनी ज्या एटीएम केंद्रातून पैसे काढले होते त्याच एटीएम केंद्रातून त्यांच्या खात्यातून ८० हजार रुपये काढण्यात आले असल्याचे त्यांना समजले. शोलंकी यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तींचेच हे काम असल्याचा संशय शोलंकी यांना आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शोलंकी यांनी बँकेकडे लेखी तक्रार नोंदवली. बँकेकडून याबाबत चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु सुमारे एक आठवडय़ानंतर त्यांना बँकेकडून फोन करण्यात आला आणि त्यांचे प्रकरण बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शोलंकी या आपल्या कामात व्यस्त असल्याने त्या पोलीस ठाण्यात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे २२ ऑक्टोबरला नयानगर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे.