कल्याण : शहाड येथे राहणाऱ्या मुलीने पहिल्या लग्नाच्या वेळी मिळालेले सोन्याचे १२ लाख १५ हजार रूपयांचे दागिने डोंबिवलीतील ठाकुर्ली भागात ९० फुटी रस्त्यावरील एका गृहसंकुलात राहणाऱ्या आपल्या आई, वडिलांकडे विश्वासाने ठेवले होते. हे दागिने मुलीने आई, वडील आणि आपल्या भावाकडे परत मागण्यास सुरूवात केल्यावर त्यांनी हे दागिने परत करण्यास नकार दिला. त्यामुळे आई, वडील आणि भावाने आपल्या सोन्याच्या ऐवजाचा अपहार केला आणि आपली फसवणूक केली, अशी तक्रार मुलीने खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारदार मुलगी ही कल्याण मधील शहाड परिसरात राहते. ही महिला खासगी शिकवणी वर्ग घेते. या महिलेचे पहिले लग्न झाले होते. त्यावेळी तिला या लग्नाच्या माध्यमातून स्त्रीधन म्हणून १२ लाख १५ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने मिळाले होते. या लग्नानंतर काही प्रश्न निर्माण झाल्यानंंतर मुलगी आपल्या ठाकुर्लीतील आपल्या आई, वडिलांच्या घरी राहण्यास होती.
या काळात पहिल्या लग्नाच्यावेळी स्त्रीधन म्हणून मिळालेले जवळील १२ लाख १५ हजार रूपयांचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने मुलीे आपल्या आई, वडिलांकडे विश्वासाने दिले होते. मला गरज वाटेल त्यावेळी हे धन मी घेईन असे तिने आई, वडिलांना सांगितले होते. मागील चार वर्षापासून तक्रारदार मुलीचे सोन्याचे दागिने आईच्या घरी सुरक्षित तिजोरीत होते.
तक्रारदार मुलीला सोन्याच्या ऐवजाची गरज वाटली म्हणून तिने आपल्या आई, वडिलांकडे स्वताचे सोन्याचे दागिने परत करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी विविध कारणे देऊन सोन्याचा ऐवज परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. सतत मागणी करूनही आई, वडील आणि आपला भाऊ आपले दागिने परत करत नाहीत म्हणून संतप्त झालेल्या मुलीने आपल्या आई, वडील आणि भावा विरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात आपल्या ऐवजाचा अपहार करून विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून तक्रार केली आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरवसे याप्रकरणाचा तपास करत आहेत.