ठाणे – येथील येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजृून तिच्यावर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या दोघांनी पिडीत तरुणीच्या कार्यालयातील महिला व्यवस्थापकालाही शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडितने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नवी मुंबई शहरातील एका कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी ठाण्यातील येऊर परिसरात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी महिला व्यवस्थापक आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या तीन तरुणी आल्या होत्या. त्यातील एका २५ वर्षीय तरुणीला सिराज चैधरी (५५) आणि यश (२४) या दोघांनी मद्य पिण्यास सांगितले.

मात्र, तिने मद्य पित नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने मद्य पाजून तेथील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच पिडितेच्या व्यवस्थापक महिलेचाही त्यांनी विनयभंग केला. या दोन्ही पिडीत महिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्तास वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दुजोरा देत या दोघा आरोपींना अटक केल्याचे सांगितले.