ठाणे : भिवंडी येथील जलवाहिनी मार्गालगतच्या गवतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. महिलेची ओळख पटविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी दिली.

कल्याण येथे राहणारा व्यक्ती कामानिमित्ताने १८ एप्रिलला जलवाहिनी मार्गे जात होता. तो परिसरातील मामा कंपाऊंड येथे आला असता, त्याला एका गवताच्या झुडप्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या व्यक्तीने घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षांचे होते. पोलिसांनी महिलेचा मृतदेह भिवंडी येथील आयजीएम सरकारी रुग्णालयात नेला. याप्रकरणाची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शवविच्छेदन अहवालामध्ये तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटविण्याचे आणि आरोपीचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. महिलेच्या हातावर बदामाचे चिन्ह आहे. तसेच इंग्रजीमध्ये ‘आर’ आणि ‘ए’ असे लिहीले आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे कार्य सुरु असल्याचे कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी सांगितले.