ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात शनिवारी एका तरुणीचा निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला आहे. तिची गळा दाबून हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत असून तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे.
वाघबीळ येथील शेंडोबा मंदिर परिसरात कासारवडवली पोलिसांचे पथक गस्ती घालत होते. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांना रोखून एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती दिली. पथक घटनास्थली गेले असता १६ ते १८ वयोगटातील एका मुलीचा मृतदेह वाघबीळ जुना रस्ता परिसरातील निर्जनस्थळी आढळून आला. तसेच तिच्या गळ्याभोवती ओढणीने गुंडाळलेले होते. महिलेची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी महिलेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले. परंतु महिलेची ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिची गळा आवळून हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे. महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.