कल्याण – कल्याण पूर्वेत एका पादचारी महिलेला रस्त्यात अडवून दोन भामट्यांनी या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील ९० हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. या महिलेला या भामट्यांनी एक मारवडी स्वखुशीने ज्येष्ठ नागरिकांना साड्या आणि किराणा वाटप करत आहे. आपण गरीब दिसाव्यात म्हणून आपण गळ्यातील सोन्याचा ऐवज काढून जवळील पिशवीत ठेवा, अशी दिशाभूल करत या भामट्यांनी ९० हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला.
सत्यवती पालाटी असे तक्रारदार आणि फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रस्ता भागात कुटुंबीयांसह राहतात. त्या खासगी नोकरी करतात. बुधवारी संंध्याकाळी चार वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार सत्यवती पालाटी कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील बंद असलेल्या महा ई सेवा केंद्र भागातून पायी चालल्या होत्या.
त्यावेळी त्यांना या भागात दोन पादचारी दिसले. ते पुढे निघून जातील असे तक्रारदार महिलेला वाटले. ते दोघे या पादचारी महिलेच्या आड आले. त्यांनी तिला थांबविले. ते हिंदी भाषेतून सत्यवती पालाटी यांच्याशी संभाषण करू लागले. या महिलेच्या गळ्यात सोन्याचे दागिने होते. या दागिन्यांवर भामट्यांची नजर होती.
सत्यवती पालाटी त्यांंना टाळून पुढे जाऊ लागल्या, पण ते आग्रह करत पीडितेला सांगत होते, की आपण आमचे म्हणणे ऐका. या भागात एक मारवाडी आहे. तो स्वखुशीने ज्येष्ठ नागरिकांना साडी आणि किराणा सामान वाटप करत आहे. आपणासही साडी आणि किराणा सामान आम्ही मिळून देतो. त्यासाठी आपण आपले गळ्यातील सोन्याचे दागिने काढून जवळील पिशवीत ठेवा. अन्यथा आपणास ते सामान मिळणार नाही, असे भामट्यांनी सांगितले.
या गडबडीत दोन्ही भामट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घातली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ९० हजार रूपये किमतीचे दागिने काढून घेऊन ते तक्रारदार महिलेच्या हातात गुंडाळी करून देत असल्याचा देखावा उभा करून हात चलाखीने ते दागिने महिलेच्या जवलील पिशवीत न ठेवता स्वताच्या ताब्यात ठेवले. या महिलेला काही अंतरावर पुढे नेत दोन्ही भामट्यांनी तेथून पळ काढला. हे दोन्ही भामटे पसार झाल्यानंतर त्यांनी आपला सोन्याचा ऐवज लुटून नेला असल्याचे समजले. त्यांनी परिसरात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ते पळून गेले होते. या महिलेने या लूट प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
