ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ खाडीत गुरुवारी दुपारी एका अज्ञान महिलेचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठविला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

घोडबंदर येथील गणपती विसर्जन घाट जवळ असलेल्या वाघबीळ खाडीमध्ये एका अज्ञात महिलेचा (अंदाजे वय २२ ते २५) मृतदेह खाडीच्या किनाऱ्या जवळ आढळला. घटनेची माहिती मिळताच, कासारवडवली पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. कासारवडवली पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे. या महिलेचा मृतदेह कासारवडवली पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठविला आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.