महिला वाहतूक पोलिसाला महिलेकडूनच मारहाण

उल्हासनगरमध्ये गृहरक्षकालाही शिवीगाळ, धक्काबुक्कीचा प्रकार

उल्हासनगरमध्ये गृहरक्षकालाही शिवीगाळ, धक्काबुक्कीचा प्रकार
उल्हासनगरमध्ये बुधवारी एका महिला दुचाकीस्वाराने आपल्या पतीच्या साहाय्याने श्रीराम सिनेमागृह येथे कार्यरत असलेली एक महिला वाहतूक पोलीस, त्यांच्या सोबतीला असलेल्या गृहरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
उल्हासनगर पूर्व भागातील श्रीराम सिनेमागृह येथील चौकात ही महिला पोलीस वाहतूक नियंत्रण करीत होती. त्यांच्या सोबतीला गृहरक्षक ए. बी. यादव होते. रस्त्याने जात असलेल्या एका महिला दुचाकीस्वाराला सलमा यांनी बाजूला घेतले व गाडीची कागदपत्रे, परवाना मागितला. यावेळी संतप्त झालेल्या महिलेने या वाहतूक कर्मचाऱ्यास उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. नियम मोडला असल्याने तुम्हाला दंड भरावा लागेल, असे महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने या महिलेस बजाविले. मात्र दुचाकीस्वार महिला कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. दुचाकीस्वार महिलेने भ्रमणध्वनीवरून लवकुमार या पतीला बोलावून घेतले.
परवाना निलंबनाची चाचपणी
पती घटनास्थळी आल्यावर दुचाकीस्वार महिला व तिच्या पतीने सलमा व यादव यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, अशी तक्रार पीडित महिला कर्मचाऱ्याने नोंदवली आहे. तसेच दंड न भरताच जबरदस्तीने दुचाकी घेऊन पळून गेले. याप्रकरणी संबंधितांचा दुचाकीचा परवाना निलंबित करता येतो का, याची चाचपणी वाहतूक पोलीस अधिकारी करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Women beat women traffic police