कल्याण : गेल्या आठवड्यात विरार लोकलमध्ये महिला डब्यात दोन महिलांमध्ये तुफान राडा होऊन एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी कर्जतहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक सुटल्यानंतर दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. एकमेकांच्या केस, झिंज्या उपटून एकमेकींना मारण्यापर्यंत मजल या महिलांची गेली. इतर महिला या दोन्ही महिलांना बाजुला करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

समाज माध्यमांवर ही मारहाणीची दृश्यध्वनी चित्रफित तुफान प्रसारित झाली आहे. मंगळवारी सकाळी कर्जतहून मुंबईला जाणारी एक अतिजलद लोकल सकाळी ८.२० वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात आली. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण येथून ही लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येते. त्यामुळे या अतिजलद लोकलमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांना मुंगी एवढीही जागा मिळत नाही. तरीही प्रवासी ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेत पोहचते त्यामुळे प्रवाशांची ही लोकल पकडण्यासाठी तुफान रस्सीखेच असते.

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची रस्सीखेच सुरू होती. महिला डब्यात चढल्यानंतर महिला डब्यात आतमध्ये चला असे सांंगत, एकमेकींना ढकलत डब्याच्या आतील भागात जाण्याचा प्रयत्न करत होत्या. दरवाजात काही महिला लटकत आहेत आतमध्ये चला असे काही महिला बोलत असताना, दोन महिलांमध्ये लोटालोटी कशासाठी करते, गर्दी आहे ना. आणि लोकलमध्ये उभे राहण्यावरून आणि ढकलाढकलीवरून वाद झाला.

या दोन महिलांमधील शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. या महिलांनी काही क्षणात आक्रमक रूप धारण केले. एकमेकींना मारहाण करून एकमेकींचे केस ओढून, झिंज्या उपटून जायबंदी करण्याचा प्रयत्न करू लागल्या.

डब्यात अगोदरच महिलांची गर्दी. त्यात या दोन्ही महिलांचे कडाक्याचे शारीरिक कसरतीचे भांडण सुरू झाले. इतर महिला या भांडणाने अस्वस्थ झाल्या. दोन्ही महिलांना एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न इतर महिला प्रवासी करत होत्या. पण दोघींनी एकमेकांचे केस घट्ट पकडले होते आणि एकमेकांना त्या जायबंदी करत होत्या. काही महिलांनी रेल्वे सुरक्षा बळाला संपर्क करून पुढील रेल्वे स्थानकात त्या डब्याजवळ येण्याची सूचना केली होती. बराच उशिरानंतर या महिलांंना एकमेकीपासून दूर करण्यात इतर महिलांना यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला डब्यातील ही दररोजची भांडणे आता प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय झाली आहेत

महिला डब्यांची अपुरी संख्या. महिला विशेष लोकल सकाळच्या वेळेत वाढवा ही महिला प्रवाशांची मागणी आहे. या विषयी आम्ही रेल्वे संघटना म्हणून रेल्वेच्या वरिष्ठांना वेळोवेळी कळविले आहे. त्याची दखल घेतली जात नाही. प्रत्येक प्रवाशाला डब्यात गर्दीतही सुस्थितीत उभे राहण्यास मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की मग अशी भांडणे होतात. आता रेल्वे, महाराष्ट्र शासनाने महिला डबा वाढवणे आणि कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा. चालू अधिवेशनात हा विषय मंजूर करावा. – लता अरगडे, अध्यक्षा,उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.