शहरबात : शहराच्या अध:पतनाविरोधात सर्वसामान्यांचा ‘एल्गार’

सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असते. अनेक गैरसोयींचा त्यांना सामना करावा लागतो.

vasai city
अनैतिक अध:पतनाविरोधात आता महिला रस्त्यावर उतरू लागल्या आहेत.

वसईची ओळख सुसंस्कृत आणि सांस्कृतिक शहर अशी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत फोफावलेला वेश्याव्यवसाय आणि लॉज संस्कृतीमुळे वसईच्या या सुसंस्कृतपणाला काळिमा फासला जात आहे. काही वर्षांपूर्वी याचे प्रमाण नगण्य होते. परंतु आता त्याचा अतिरेक झाला असून त्याची झळ सर्वसामान्य महिलांना बसत असल्यामुळे या अनैतिक अध:पतनाविरोधात आता महिला रस्त्यावर उतरू लागल्या आहेत.

सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असते. अनेक गैरसोयींचा त्यांना सामना करावा लागतो. या समस्यांवर राजकीय पक्ष आंदोलने करतात. पण त्यात सर्वसामान्यांच्या सहभागाचा नेहमीच अभाव जाणवतो. परंतु याहीपलीकडे लोकांची उत्स्फूर्त आंदोलने ही होतात. त्यात कधी रेल्वेच्या अनियमिततेविरोधातील लोकांचा उद्रेक असतो, तर कधी एखाद्या अपघातानंतर लोकांचा जमाव रस्त्यावर येतो. पण अशी उत्स्फूर्त आंदोलने क्वचितच होतात. सध्या वसई-विरार आणि भाईंदर शहरात लोकांच्या अशाच उत्स्फूर्त आंदोलनाची हवा आहे. विशेष म्हणजे, कुठल्याही नेतृत्वाशिवाय या आदोलनांची दिशा ठरवली जात आहे. कारण सर्वसामान्यांच्या मते, हा विषय नैतिकतेचा असून शहरात बिनदिक्कत सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. वसई रोड स्थानकातील लॉजेस, रस्त्यावर उभ्या राहून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वेश्या, घराघरात चालणारे खासगी वेश्याव्यवसाय यामुळे महिलांना रस्त्यावर चालणेही असह्य़ झाले आहे. अशीच परिस्थिती भाईंदरचीदेखील आहे. वाढत्या लॉजेसमुळे वसईच्या किनारपट्टीवरील गावचे गावपण हरवून जाताना त्याला बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. तर वसईच्या किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूमधील प्रेमीयुगुलांची अश्लील कृत्ये, अमली पदार्थाचे सेवन यामुळे त्यांचे पावित्र्यही नष्ट झाले आहे. त्यामुळे या नैतिक अध:पतनाच्या विरोधात नागरिकांचा रोष अधिक तीव्र होऊ लागला आहे.

शहरातील अनैतिकतेविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरणे ही बाब पोलीस यंत्रणेसाठी लाजिरवाणी आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षकपदी महिला अधिकारी असताना या अनैतिक धंद्याविरोधात महिलांना आंदोलन करावे लागणे हा देखील विरोधाभास आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने पोलिसांनीदेखील केवळ बघ्याची भूमिका न घेता ठोस कारवाईची गरज आहे. अन्यथा उद्रेकांची ही ठिणगी वणव्यात परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही.

 रस्त्यावरच वेश्याव्यवसाय

वसई रोड परिसराच्या नागरिकीकरणाबरोबर अनेक विकृतींचा शिरकाव झाला आहे. लोकसंख्या वाढल्याने नवनवीन इमारती उभ्या राहिल्या, पण याचबरोबर वेश्याव्यवसायासारखी कीडदेखील या शहराला लागली आहे. तसा हा वेश्याव्यवसाय नवा नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याचे स्वरूप अधिक घाणेरडे होत असल्यामुळे सर्वसामान्य महिलांना रस्त्यावर चालणेदेखील कठीण झाले आहे. पूर्वी संध्याकाळ झाली की रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात काळोखाच्या आडोशाला या महिला उभ्या राहत असत. पण आता भरदिवसादेखील गिऱ्हाईकाच्या शोधात या महिला उभ्या असतात. शहरातील स्कायवॉकपासून पदपथावर या महिला घोळक्यांनी उभे राहून आपले सावज हेरतात. वसईच्या अंबाडी रोड येथील पोलीस चौकीच्या समोरदेखील अशाच प्रकारे अश्लील प्रकार सुरू असतात. वसई रोड परिसरात आनंदनगर हा परिसर रहिवासी संकुलातील परिसरात तर सर्वसामान्य महिलांना, तरुणींना त्या अश्लील नजरेने पाहण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वारंवार तक्रारी करून स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे अखेर याविरोधात महिलांनीच पुढाकार घेताना सह्य़ांची मोहीम राबविताना याविरोधात कठोर कारवाईची मागणी करताना पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. नागरिकांच्या या उद्रेकानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने वेश्यांविरोधात मोहीमही हाती घेतली होती. पण त्यातील सातत्याच्या अभावामुळे या समस्येचे मूळ अजूनही कायम आहे. शहरातील गल्लीबोळांमध्ये सुरू असलेल्या व्हिडीओ पार्लरमध्ये दाखविण्यात येणाऱ्या अश्लील चित्रपटांमुळे या मनोवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम अविरतपणे सुरूच आहे.

लॉजच्या वाढत्या संख्येवर र्निबध गरजेचे

शहरात वेश्याव्यवसायाचे स्तोम वाढत असताना वाढलेल्या लॉजच्या संख्यावर आता नियंत्रण आणण्याची नितांत गरज आहे. याविरोधाच स्वयंसेवी संस्था आंदोलनाचे मार्ग अवलंबत आहेत. पण त्यानंतरही पोलीस, प्रशासन यांचे होत असलेले दुर्लक्ष ही मोठी शोकांतिका आहे. वसई स्थानक काही पर्यटनस्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही. या ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येण्याला वाव नाही. तरी प्रशासनाकडून अशा अनैतिक गोष्टींनी वाव देणाऱ्या या लॉजवर बंदी का घातली जात नाही, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांनाही पडत आहे. या लॉजधारकांचे पोलिसांबरोबर असलेले अर्थपूर्ण संबंधांमुळेच तक्रारी केल्यानंतरही केवळ कारवाईचा दिखाऊपणा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

किनारपट्टीवर गावकऱ्यांची दहशत

वसईच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले सगळी लॉजेस अनधिकृत आहेत. या लॉजेस विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून ओरड सुरू आहे. मात्र त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. या अश्लील हुल्लडबाजीचा आता गावकऱ्यांनीच बंदोबस्त केला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर अश्लील कृत्य करणाऱ्यांना चोप देण्यात येईल, अशा आशयाचे फलक गावागावांतील चौकात लावले आहेत. त्यामुळे काहीअंशी तरी किनारपट्टीवरील या बाजारूपणाला गावकऱ्यांच्या दहशतीमुळे चाप बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Women protest on road against prostitution activities in vasai