‘अबोली’च्या मार्गात काटे!

रिक्षा व्यवसायात महिलांना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने महिलांना अबोली योजनेंतर्गत परवाने दिले.

(संग्रहित छायाचित्र)

महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून त्रास; शिवीगाळ, मारहाण, व्यवसाय करण्यात आडकाठी

महिलांनी रिक्षा चालून उदरनिर्वाह करावा यासाठी राज्य शासनाने अबोली योजनेंतर्गत महिलांना पाच टक्के राखीव कोटय़ातून रिक्षा परवाने दिले. मात्र महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. शिवीगाळ करणे, मारहाण, खोटय़ा तक्रारी दाखल करणे, रिक्षा पंक्चर करणे, व्यवसाय करण्यास आडकाठी करणे या प्रकारांमुळे महिला रिक्षाचालकांना जेरीस आणले जात आहे.

रिक्षा व्यवसायात महिलांना रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने महिलांना अबोली योजनेंतर्गत परवाने दिले. वसई-विरार शहरात ३५ महिलांना इरादापत्र देण्यात आले. या महिलांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या. रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून अनुज्ञप्ती बिल्ला घेऊन रिक्षा परवाने घेतले आणि व्यवसाय सुरू केला. मात्र या व्यवसायात मक्तेदारी असलेले पुरुष रिक्षाचालक त्रस्त झाले आणि त्यांनी या महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली.

महिला रिक्षाचालक प्रवासी घेत असताना त्यांच्या मध्ये रिक्षा घुसवून प्रवासी भरणे, अश्लील शेरेबाजी करणे, क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करणे असे प्रकार केले जात आहेत, असे महिला रिक्षाचालक दर्शिका विसावाडिया यांनी सांगितले. मला दोन वेळा पुरुष रिक्षाचालकांनी मारहाण केली. हाच अनुभव इतर महिला रिक्षाचालकांना येत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही काम करू नये, असा इतर पुरुष रिक्षाचालकांचा प्रयत्न असतो, असे त्या म्हणाल्या. याविरोधात दर्शिकाने पोलीस, परिवहन आयुक्त, वाहतूक पोलिसांपासून महिला आयोगापर्यंत दाद मागितली आहे. मात्र काहीच फरक पडलेला नाही.

अनेकदा आमच्या रिक्षाचे चाक खिळे मारून पंक्चर केले जाते. त्यामुळे आमचा दिवस वाया जातो, रोजगार बुडतो, असे महिला रिक्षाचालकांनी सांगितले. महिला रिक्षाचालकांच्या विरोधात पुरुष रिक्षाचालकांनी विरारमध्ये बंदही पुकारला होता. आम्ही तक्रारी करायला गेल्यावर सगळे पुरुष रिक्षाचालक जमा होतात आणि पोलिसांवर दबाव टाकतात. पोलीसही त्यांची बाजू घेतात आणि कारवाई करत नाही, असा आरोप महिला रिक्षाचालकांनी केला आहे.

महिला चालकांना पुरुष रिक्षाचालक त्रास देत असतील तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी सांगितले. महिलांच्या तक्रारीनंतर आम्ही एका रिक्षाचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणी त्यांना त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे विरारचे उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले.

महिला मध्येच प्रवासी भरतात, असा आरोप पुरुष रिक्षाचालक करतात आणि कारवाई करायला पोलिसांना सांगतात. आम्ही संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिक्षा चालवतो.  आम्हाला संध्याकाळी व्यवसाय करता येत नाही. मात्र दिवसाही पुरुष रिक्षाचालक त्रास देतात.

– पल्लवी गुळवे, महिला रिक्षाचालक

मला काम करताना पुरुष रिक्षाचालक त्रास देतात. आम्ही प्रवासी भरल्यावर दमदाटी करून आमच्या प्रवाशांना खाली उतरवतात. मला पुरुष रिक्षाचालकाने मारहाण केली, परंतु केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवण्यात आला.

– रसिका मानकर, महिला रिक्षाचालक

महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने रिक्षा परवान्यासाठी महिलांना पाच टक्के आरक्षण दिले. मात्र या महिलांना रिक्षा चालवण्याच्या कामात पुरुष रिक्षाचालक आडकाठी आणत आहेत. या महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

– विजय खेतले, अध्यक्ष, ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालक महासंघ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Women rickshaw drivers suffer from rickshaw pullers

ताज्या बातम्या