ठाणे : महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये तब्बल २५ वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने खेळविण्याबरोबरच आयपीएलचा सराव करण्यात आलेले असतानाच, त्यापाठोपाठ आता याच मैदानात पहिल्यांदाच होणाऱ्या महिला आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमासाठी क्रीडा प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापनाकडे एमसीएकडून विचारणा करण्यात आली असून त्यात त्यांनी १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान मैदान राखीव ठेवण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खेळपट्टी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार नव्हती. यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रीकेट सामने होत नसल्याने क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी काही वर्षांपुर्वी तयार केली.

बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार करण्यात आल्यामुळे या मैदानावर तब्बल २५ वर्षानंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने पार पडले. त्यानंतर या मैदानाची निवड करत आयपीएलमधील कोलकत्ता नाईट रायडर्स आणि आरसीबी टीमच्या खेळाडूंनी येथे सराव केला. या मैदानात यंदा आयपीएलचे किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीकेट सामने व्हावेत यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्यासाठी मैदानात विद्युत तसेच इतर व्यवस्था उभारणीचे काम वेगाने सुरु आहेत. असे असतानाच, आता याच मैदानात पहिल्यांदाच होणाऱ्या महिला आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमासाठी एमसीएकडून क्रीडा प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापनाकडे विचारणा करण्यात आली आहे. १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान आयपीएल महिला संघाचा लिलाव कार्यक्रम होण्याची शक्यता असून त्यासाठी मैदान राखीव ठेवण्याबाबत एमसीएने क्रीडा प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापनासोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

पीपीपी तत्वावर हाॅटेल

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील मैदानात आयपीएलचे किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीकेट सामने व्हावेत यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदान विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अशा सामन्यांसाठी खेळाडूंकरिता परिसरात पंचतारंकित हाॅटेलची व्यवस्था असावी लागते. परंतु तशी सोय उपलब्ध नसल्यामुळे मैदानाच्या परिसरातच पीपीपी तत्वावर एक पंचतारंकित हाॅटेल उभारणीचा विचार पालिकास्तरावर सुरु असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens ipl auction to be held in thane from mca ask ysh
First published on: 01-02-2023 at 15:58 IST