Cricket News/India vs SA Womens Final : भारतीय महिला संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर असून आज, रविवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर यंदाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडीयम बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सकाळपासूनचं स्टेडियम बाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कुर्ला ते वाशी या हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. आता, अंतिम फेरीत भारतीय महिला संघाच्या समोर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे,हे दोनही संघ आपल्या पहिल्या विश्वविजयासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार हे निश्चित आहे.भारतीय महिला संघ महिला विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे यंदा संघ ट्रॉफी पटकावणार का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये आज, रविवारी दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी सकाळपासून चाहत्यांनी स्टेडियम बाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येत आहेत.
महिला आंतरराष्ट्रीय विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी हा मेगा ब्लॉक नियोजित करण्यात आला होता. परंतू, आता सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील गाड्या रविवारीच्या वेळापत्रकानुसार चालविण्यात येत आहेत.
