भाईंदरच्या खाडीवरील पुलाच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध

वसई-विरार शहर भाईंदर खाडीवरून मुंबईला जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाईंदर खाडीवर वाहनांसाठी सहापदरी पूल बांधण्याच्या कामाच्या निविदा मंगळवारी एमएमआरडीएने प्रसिद्ध केली. २०१३ मध्ये या कामाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे ११०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे वसई ते भाईंदर अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करू शकता येणार आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेलेले आहे. मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. भाईंदरला जरी जायचे तर महामार्गावरून जावे लागत होते. वसईहून भाईंदरला रेल्वेने जाण्यासाठी दहा मिनिटे लागत असली तरी महामार्गावरून जाण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भाईंदर-नायगावदरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भाईंदर खाडीवर रेल्वेपुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषदेने १०० कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या.

अखेर मंगळवारी एमएमआरडीएने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १५ ऑक्टोबपर्यंत निविदेला अंतिम मंजुरी मिळणार आहे. या पुलासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आम्ही निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. दोन वर्षांत हा पूल पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.

पूल असा असेल..

* भाईंदर खाडीवरून रेल्वेपुलाला समांतर असा हा पूल असणार आहे.

* त्याची लांबी पाच किलोमीटर, तर रुंदी ३० मीटर असेल. या पूल सहा पदरी आहे.

*  या पुलाला भाईंदर, पाणजू आणि नायगाव या तिन्ही ठिकाणी उतार असेल.

* या पुलाचा खर्च ११०० कोटी.

पूल असा जोडणार..

नायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंग रूटला जोडला जाणार आहे. तेथून तो वसईमार्गे विरारच्या नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. भाईंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दहिसपर्यंत जाणार आहे. यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भाईंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ  शकणार आहे.

पाणजूवासीयांना आनंद

नायगाव आणि भाईंदर यांदरम्यान असणाऱ्या पाणजू बेटावर जाण्यासाठी बोट हाच पर्याय आहे. पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे धोक्याचे असते. त्यामुळे पाणजूचे रहिवासी भाईंदर खाडीवरील जुन्या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून चालत जातात. भाईंदर खाडीवरील नव्या पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे.

पुलाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल.

– दिलीप कवठकर, प्रकल्प संचालक, एमएमआरडीए