अन्य विकासकामांशिवाय मुख्य मार्गिकेच्या कामास वाहतूक विभागाची परवानगी नाही

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलाच्या मुख्य मार्गिकेचे काम आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सेवारस्त्यांवरील खड्डे बुजवणे, मलनिस्सारण वाहिनीजवळ काँक्रीट रस्ता तयार करणे तसेच आनंदनगर येथील सेवारस्त्यामध्ये दुभाजक उभारणे ही कामे पूर्ण झाल्याशिवाय मुख्य मार्गिकेच्या कामास परवानगी देण्यास वाहतूक पोलिसांनी नकार दर्शवला. त्यामुळे दिवाळीनंतरच मुख्य मार्गिकेच्या बांधकामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

महामार्गावरील अरुंद असलेल्या कोपरी रेल्वे पुलाचे काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाने रस्ता रुंद करून दोन अतिरिक्त मार्गिका तयार केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या मार्गिकांवरून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुख्य मार्गिकांचे काम हाती घ्यावे लागणार आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संपूर्ण कोपरी पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेकडून सुरू आहे. एका वर्षाच्या आत हा संपूर्ण पूल तयार करण्याची घोषणाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या आग्रहामुळे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

एमएमआरडीएचे अधिकारी मुख्य मार्गिकेचे काम सुरू करण्याची परवानगी घेण्यासाठी वाहतूक शाखेकडे गेले होते. मात्र मुख्य मार्गिकेचे काम सुरू झाल्यास अतिरिक्त मार्गिकांवर ताण येणार आहे. तसेच सकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर तुळजाभवानी मंदिर सेवारस्ता आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेल्या मलनिस्सारण वाहिनीजवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. हा रस्ता झाल्यास कोपरीच्या दिशेने जाणाऱ्या परिवहन विभागाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहनांना दिलासा मिळणार आहे. तसेच आनंदनगर येथील सेवारस्त्यांमध्ये प्लास्टिकचे खांब असलेले दुभाजक बसविण्याच्या सूचना एमएमआरडीएला करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेलाही सेवारस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. मध्य रेल्वेने त्यांचे शेकडो टन वजनाच्या लोखंडी तुळई मुख्य मार्गावर रस्त्याकडेला ठेवली आहे. ही लोखंडी तुळईही रस्त्यावरून हटविण्यास सांगण्यात आलेले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक विभागाकडून परवानगी मिळणार आहे.

दिवाळीनंतर कामास सुरुवात?

काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. सेवारस्त्यावरील खड्डे बुजविणे, दुभाजक बसविण्यासही वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोपरी पुलाच्या मुख्य मार्गिकेच्या निर्माणास दिवाळीनंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे.