scorecardresearch

सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम लांबणीवर ; निधी मिळूनही निविदा प्रक्रिया संथगतीने

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाच्या निविदा अजूनही काढण्यात आलेल्या नाहीत. या कामाच्या निविदा जाहीर करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे सुपरस्पेश्यालिटी रुग्णालय उभारणीचे कामही लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची उभारणी ब्रिटिश काळात म्हणजेच १९३६ मध्ये करण्यात आली होती. या जुन्या इमारती अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून त्याजागी सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने ९ मार्च २०१८ मध्ये मान्यता दिली होती.
ठाणे जिल्हा रुग्णालय ३६७ खाटांचे आहे. त्यात वाढ करून ५७४ खाटांचे सुपरस्पेश्यालिटी रुग्णालय उभारणीचा सुरुवातीला प्रस्ताव होता. त्यासाठी ३१४ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे निधी खर्च झाला नव्हता. त्याचदरम्यान नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्रस्तावित भूखंडावर ५.३० इतका चटई क्षेत्र निर्देशांक लागू झाला. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव तयार केला. त्यास मंजुरी मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पूर्वीच्या प्रस्तावात सहा मजली इमारत प्रस्तावित होती.
नव्या प्रस्तावानुसार दहा मजली इमारत होणार असून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. यामुळे ५७४ खाटांऐवजी ९०० खाटांचे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या कामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. निधीचा अडसर दूर झाल्यामुळे या कामाचा शुभारंभ वेगाने केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारत उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया याच विभागामार्फत राबवली जाणार आहे. असे असले तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णालय उभारणीचे काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
सुपरस्पेश्यालिटी रुग्णालयाच्या निविदा काढण्याच्या कामास उशीर होत नसून या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून महिनाभरात निविदा जाहीर केल्या जातील. तसेच या कामासाठी विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागणार असून ही कामेही सुरू आहेत. – वि. ल. कांबळे , अधीक्षक अभियंता. सा. बां. मंडळ, ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Work on superspeciality hospital postponed despite funding tender process was slow amy

ताज्या बातम्या