कनिष्ठ अभियंत्यांच्या कमतरतेमुळे नगररचना विभागाच्या कामकाजावर परिणाम; गोळीबार प्रकरणातील निलंबित अभियंत्याचे पद रिक्तच

भाईंदर :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे काही प्रभागातील कामे ठप्प झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत असून पालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे मिरा रोड येथील कनकिया परिसरात स्वतंत्र नगररचना विभाग आहे. हा विभाग पालिकेच्या आर्थिक उत्पन्नातील दुसऱ्या क्रमांकाचा मुख्य स्रोत आहे.

या विभागात एकूण सहा कनिष्ठ अभियंता कार्यरत राहत असून प्रत्येकाला प्रभाग वाटून देण्यात आले. मात्र पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यावर पदोन्नती मिळत नसल्याच्या नैराश्यातून  हल्ला केल्याच्या प्रकरणात नगररचना विभागातील श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख या दोन कनिष्ठ अभियंत्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या अधिकाऱ्यांना अटक करून २० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील पालिका प्रशासनाने त्या जागी नव्या अभियंताची निवड केलेली नाही.

त्यामुळे देशमुख यांच्याकडे असलेले मिरे व घोडबंदर येथील प्रभाग आणि मोहिते यांच्याकडे असलेल्या नवघर येथील प्रभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. तर या प्रभागात राहत असलेले नागरिक वारंवार पालिका कार्यालयात फेऱ्या मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे थेट कामकाजच बंद असल्याने नागरिकांची गैर सोय होत असून पालिकेचे उत्पन्नदेखील रखडल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

अद्याप नगररचना विभागात नव्या अभियंत्यांची निवड करण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.  – सुनील यादव, आस्थापना प्रमुख, मीरा-भाईंदर महानगरपालिका