scorecardresearch

डोंबिवली : रात्री दोन वाजता महावितरणच्या कामगारांनी आणून बसविले वीज मीटर

महावितरणच्या कामगारांनी वीज देयक भरणा करुनही दोन्ही वीज मीटर का काढून नेले होते याचा उलगडा झाला नाही.

डोंबिवली : रात्री दोन वाजता महावितरणच्या कामगारांनी आणून बसविले वीज मीटर
(संग्रहीत छायाचित्र)

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील केळकर रस्त्यावरील एका सोसायटीतील एका गृहस्थांच्या दोन सदनिकांचे वीज मीटर वीज देयक वेळेवर भरुनही महावितरणच्या कामगारांनी काढून नेले होते. या गृहस्थांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे रविवारी रात्री १२ वाजता यासंदर्भात तक्रार केली. आणि वेगाने हालचाल होऊन रात्री दोन वाजता महावितरण कामगारांनी दोन्ही वीज मीटर आणून बसविलेही.वीज पुरवठा पूर्ववत केला.महावितरणच्या कामगारांनी वीज देयक भरणा करुनही दोन्ही वीज मीटर का काढून नेले होते याचा उलगडा झाला नाही. महावितरणच्या कार्यालयात यासंदर्भात संपर्क केला तेथून प्रतिसाद मिळाला नाही. हे दोन्ही वीज मीटर रिडिंग दाखवत नाहीत. ते बंद आहेत या विचाराने वीज मीटर काढून नेले होते का, याविषयी उलगडा झाला नाही.

केळकर रस्त्यावर एका निवृत्त गृहस्थांच्या मधुरा सोसायटीत दोन सदनिका आहेत. पत्नी आणि ते निवृत्त असल्याने पुणे येथे मुलीकडे असतात. काही कार्यक्रम किंवा महिन्यातून एखादी फेरी ते डोंबिवलीत मारतात. पुणे-डोंबिवली असे त्यांचे येणे जाणे सुरू असते.

रविवारच्या काही कार्यक्रमा निमित्त हे गृहस्थ पुण्याहून दुपारी निघून रात्री उशिरा डोंबिवलीत परतले. घरात वीज असेल असा विचार करुन ते घरात आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील विजेचे दिवे, पंखे चालू होत नाहीत. म्हणून त्यांनी घरातल्या घरात वीज पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला. आजुबाजुला, इमारतीत वीज पुरवठा सुरळीत आहे आणि आपल्याच दोन्ही सदनिकांमध्ये वीज पुरवठा का नाही म्हणून त्यांना संशय आल्याने ते इमारतीच्या तळमजल्याला सोसायटीचे महावितरणकडून वीज मीटर लावलेल्या खोलीत गेले. तेथे त्यांना सदनिकांना वीज पुरवठा करणारे दोन्ही वीज मीटर महावितरणने काढून नेल्याचे दिसले. नियमित वेळेत वीज देयके भरणा करुनही महावितरण कामगारांनी वीज मीटर काढून नेल्याने आता रात्रभर काळोखात राहावे लागेल असा विचार या गृहस्थांनी केला. रागाच्या भरात त्यांनी महावितरण कामगारांच्या नियमबाह्य कृतीबद्दल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे रात्री १२ वाजल्यानंतर व्हाॅट्सपच्या माध्यमातून तक्रार केली. अन्य परिचितांना त्यांनी घडला प्रकार सांगितला.

रात्रीतून महावितरण अधिकारी, कर्मचारी मोबाईल उचलणार नाहीत असा विचार करुन या गृहस्थांनी शांत राहणे पसंत केले. वीज मीटर का काढून नेले असा विचार सुरू असतानाच रात्री दोन वाजता या गृहस्थांना घरातील वीज,पंखे सुरू झाल्याचे दिसले. वीज मीटर काढून नेले असताना वीज पुरवठा सुरू झाला कसा असा विचार करुन हे गृहस्थ पुन्हा विजेरी घेऊन इमारतीच्या तळ मजल्याला वीज मीटर खोली जवळ गेले. तेव्हा त्यांना आहे त्या जागी आपल्या सदनिकांचे दोन्ही वीज मीटर लावले असल्याचे दिसून आले. महावितरणच्या कामगारांनीच हे काम करुन ते निघून गेल्याने त्यांना वस्तुस्थिती कळली नाही. मात्रा, खा. डाॅ. शिंदे यांनी चक्र हलविल्यामुळे हे घडले असे या गृहस्थांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Workers of msedcl brought and installed electricity meters at two oclock in the night amy

ताज्या बातम्या