ठाणे : दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका, शाळा, महाविद्यालयांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही या दिनाचे औचित्य साधत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने निसर्गोत्सव, ठाणे पालिकेचा उत्सव वसुंधरेचा तर, मुरबाडमध्ये हिरव्या देवाची यात्रा हे कार्यक्रम रंगणार आहे.
पर्यावरणाचे संवर्धन, जतन आणि त्याची गुणवत्ता अबाधित राहावी या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा केला जातो. या अंतर्गत पर्यावरण प्रेमी संस्थांच्यावतीने वृक्षारोपण, विविध कार्यशाळा, परिसंवाद, स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाही अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका, एन्व्हायरो व्हिजिल आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्यावतीने ‘निसर्गोत्सव’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रदर्शन, पर्यावरणपूरक उत्पादने, बागकाम कार्यशाळा आणि पर्यावरणीय जनजागृती सत्र होणार आहेत. तसेच विविध स्पर्धा देखिल असणार आहेत. हे कार्यक्रम शनिवार, ७ जून आणि रविवार, ८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणात आहेत. यामध्ये कुंडीतील फुलझाडे, परसबाग या कार्यशाळा असतील. तसेच इंडोर प्लांटस स्पर्धा, टेरारियम स्पर्धा तर, प्लॅस्टिक आणि पर्यावरण, सर्प मित्रांशी गप्पा हे चर्चासत्र होणार आहेत. हा उपक्रम डोंबिवली पुर्वेतील आनंद बालभवनात असणार आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने देखील उत्सव वसुंधरेचा उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये देखील प्रदर्शन, विविध परिसंवाद, कार्यशाळा पार पडणार आहेत. यामध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार आहेत. तसेच नैसर्गिक रंग, कचऱ्यातून कला, शाडू मातीच्या मुर्ती तयार करणे अशा विविध कार्यशाळांचे देखिल आयोजन केले आहे. हा सोहळा गुरूवार, ५ जून ते रविवार, ८ जून पर्यंत ठाण्यातील गावदेवी मैदानात संपन्न होणार आहे.
तर, मुरबाड तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही हिरव्या देवाची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी, कातकरी समाजाची जीवनपद्धती, खाद्य संस्कृती, पावसाळ्यातील रानभाज्या, त्यांची ओळख आणि पाककृती अशा सर्व गोष्टींची माहिती शहरवासियांना देखिल मिळावी, यासाठी दरवर्षी ही हिरव्या देवाची यात्रा भरवली जाते. यंदा जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच ५ जून रोजी मुरबाडच्या केवारवाडी आणि १५ जून रोजी मासले बेलपाडा येथे ही हिरव्या देवाची यात्रा होणार आहे. यामध्ये कलाकुसर, खाद्यसंस्कृती, रानभाज्या, त्यांची बनवण्याची पद्धत, निसर्ग रांगोळी यांचा अनुभव घेता येणार आहे. तसेच यंदाच्या यात्रेत स्थानिक बी बियाणे संकलन करणाऱ्या बांधवांशी संवाद साधण्याचा प्रमुख उद्देश असणार आहे.