भाईंदर परिसरातून पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेल्या नर बिबट्याचा येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. बिबट्याला बसविण्यात आलेल्या उपग्रह गळपट्टा प्रणालीमधून मृत्यूचा संकेत प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेतलेल्या वनाधिकाऱ्यांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तर बिबट्याचे या बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहे.

वन विभागाच्या माध्यमातून १९ डिसेंबर २०२५ रोजी भाईंदर येथील मानवी वस्तीमधून या नर बिबट्याचे बचाव कार्य करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व निरीक्षणासाठी त्याला बोरिवली येथील संजय राष्ट्रीय उद्यान येथील सुविधांमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर २२ डिसेंबर रोजी गठीत समितीच्या बैठकीत सर्व बाबींचा विचार करून बिबट्याला उपग्रह गळपट्टा बसवून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.२५ वाजता सदर बिबट्याला येऊरच्या जंगलातील परिसरातील नागला परिमंडळ, ससुनवघर नियतक्षेत्रात मुक्त करण्यात आले. मुक्ततेच्या वेळी बिबट्या सुदृढ व चपळ असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर वन्यजीव बचाव पथक, येऊर वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी तसेच डब्ल्यूसीएस इंडिया यांच्या माध्यमातून त्याचे सातत्याने निरीक्षण सुरू होते.तसेच या उपग्रह पट्ट्याच्या माध्यमातून २५ ते ३० डिसेंबरदरम्यान बिबट्याचा ससुनवघर नियतक्षेत्रात नियमित वावर नोंदवला गेला.

तर ३१ डिसेंबर रोजी गुफा असलेल्या भागात या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे आढळून आले. तसेच ५ जानेवारी २०२६ रोजी नागला ट्रेल परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे व विष्ठा आढळली होती. जंगलात बसवलेल्या स्वयंचलित छायाचित्र यंत्रणेमध्येही (कॅमेरा सापळा) बिबट्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसून आला होता.

मात्र २ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी उपग्रह गळपट्टा प्रणालीतून मृत्यूचा संकेत प्राप्त झाल्यानंतर वनविभाग व डब्ल्यूसीएस टीमने नागला राखीव वनातील संबंधित ठिकाणी पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून बिबट्याचे नखे, दात व इतर महत्त्वाचे अवयव सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. प्रकाशअभावी त्या दिवशी शवविच्छेदन शक्य न झाल्याने ३ फेब्रुवारी रोजी सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमानुसार मृतदेह तपासणी (शवविच्छेदन) करण्यात आली. आवश्यक नमुने वैद्यकीय व तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी नागला परिमंडळात वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत पुढील कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.